मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी साचल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणारी अप जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक काहीवेळासाठी बंद करण्यात आली होती. पण आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नालासोपाऱ्यातून जलद मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाण्याची पातळी १८० एमएम पर्यंत पोहोचली होती.

त्यानंतर खबदारीचा उपाय म्हणून जलद मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली. पाण्याची पातळी कमी होऊन १३० एमएम झाल्यानंतर ११.३० वाजल्यापासून पुन्हा जलद मार्ग खुला झाला. मुंबई प्रमाणेच शेजारच्या ठाण्यात, वसई, विरारमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पण अद्यापही पश्चिम रेल्वेची वाहतूक कुठेही ठप्प झालेली नाही. फक्त नालासोपाऱ्यात काहीवेळासाठी जलद मार्ग बंद झाल्याने लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

पहाटेपासून मुंबई आणि उपनगर परिसराला पावसाने झोपडून काढले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात उत्तर आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. एवढेच नाही तर कोकणासह राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर कायम आहे.