वसई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एका तरुणाने अपशब्द उच्चार करीत समाजमाध्यमावर टीका केली आहे. या टिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी या तरुणाला शोधून काढत चांगलाच चोप देत धिंड काढली. त्याचा व्हिडीओ ही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
समाज माध्यमावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी आता कोणत्याही थराला जाऊन एखाद्यावर टीका करणे, याशिवाय त्याचा व्हिडीओ तयार करून समाज माध्यमावर टाकणे असे प्रकार वाढीस लागत आहेत. नुकताच नालासोपारा येथील एका तरुणाने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. ही आक्षेपार्ह पोस्ट टाकणे या तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे.
ही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी या तरुणाचा शोध घेत थेट राहत्या घरातून बाहेर काढून चांगलाच चोप देत त्यांची धिंड ही काढली आहे. याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे विविध स्तरातून त्याच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
https://twitter.com/i/status/2017062253111947524
याबाबत मनसेच्या मनसे रिपोर्ट या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील ट्विट करण्यात आले आहे. “धिंड काढली. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल केवळ ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी हा तरुण अर्वाच्च भाषेत टीका आणि शिवीगाळ करत होता. एका मर्यादेपर्यंत टीका सहन केली जाऊ शकते, परंतु प्रसिद्धीसाठी सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन विधाने करणाऱ्या या तरुणाची महाराष्ट्र सैनिकांनी ‘धिंड’ काढली.” असे मनसेने या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

