scorecardresearch

“महेश आयुष्यात आला आणि…” अखेर नम्रता शिरोडकरने सांगितले चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण

तब्बल १७ वर्षांनी नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

“महेश आयुष्यात आला आणि…” अखेर नम्रता शिरोडकरने सांगितले चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण
महेश बाबू नम्रता शिरोडकर

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयाबरोबर आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा महेश बाबू अभिनेत्री नम्रता शिरोडकरला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रताने सिनेसृष्टीला रामराम केला. यानंतर आता तब्बल १७ वर्षांनी नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण सांगितले आहे.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. नुकतंच नम्रताने तिने लग्नानंतर करिअर का सोडले याबद्दलचे कारण सांगितले आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या निर्णयाचा खुलासा केला.
आणखी वाचा : ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ चाहत्याच्या प्रश्नावर पत्नी नम्रता म्हणाली…

“मी खूप आळशी होते. मी नेहमी ठरवायचे त्याप्रमाणे काहीही घडायचं नाही. जे काही घडलं ते आपोआप घडलं. पण मी जे निर्णय घेतले ते योग्य होते आणि मी त्यात आनंदी आहे, असं मला वाटते. मला मॉडेलिंगचा कंटाळा आल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आले. मॉडेलिंगनंतर अभिनय ही पुढची पायरी होती. त्यानंतर मी माझ्या कामाचा आनंद घेऊ लागले. अभिनयाला गांभीर्याने घेऊ लागले तेव्हा मला महेश भेटला. आमचं लग्न झालं. त्यामुळे जर तेव्हा मी माझं काम गांभीर्याने घेतलं असतं तर माझं आयुष्य आतापेक्षा खूप वेगळं असतं. पण मी काही तक्रार करत नाही.

महेश आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. त्यानंतर माझं सगळं जगच बदलून गेलं. मला लग्नाचा अनुभव चांगला वाटत होता. मातृत्व आणि आई होण्याचा अनुभवही पूर्णपणे वेगळा होता. त्यामुळे मी कोणताही चुकीचा निर्णय घेतला असे मला वाटत नाही”, असेही नम्रताने यात म्हटले. 

आणखी वाचा : “मी तुमच्या मुलावर….” सासूबाईंच्या निधनानंतर नम्रता शिरोडकरची भावूक पोस्ट

दरम्यान महेश-नम्रताने चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला. महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत. नम्रता आणि महेश बाबू यांनी २००५ मध्ये त्यांच्या ‘अथाडू’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नम्रता सध्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहते. नम्रता आता चित्रपट निर्माती बनली आहे. तिने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेजर’ चित्रपटाची निर्मिती केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 09:42 IST

संबंधित बातम्या