Nana Patekar on Maharashtra Politics over Caste : “काही राजकारणी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याना निवडणुकीच्या वेळी मतदानातून उत्तर द्या” असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं आहे. नाना पाटेकर यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगरमधील एका महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी नानांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थांना आवाहन केलं की “जातीपातीच्या मुद्दयांना केराची टोपली दाखवा. जातीवरून राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या.”
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जाती-जातींमधला संघर्ष वाढला आहे. अनेकदा दोन वेगवेगळ्या जातींच्या समूहांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. वेगवेगळ्या भागात धर्माच्या नावाखाली तणाव निर्माण झाल्याच्या घटना बऱ्याचदा घडल्या आहेत. राजकारणी, त्यांची चिथावणीखोर भाषणं, टिका-टिप्पणी या सगळ्यांमुळे असा संघर्ष होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. आरक्षणासाठी अनेक जातींचे लोक रस्त्यावर उतरत आहेत. राज्यात व देशात आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आता कुठल्याही जातीला नवं आरक्षण देणं शक्य नाही. परिणामी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जातींमधला संघर्ष वाढला आहे. या सगळ्यावर महाराष्ट्रातील लेखक, साहित्यिक, कलाकार, बुद्धिजीवी लोक बोलणं टाळतात. मात्र ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे सातत्याने देशातील राजकीय व सामाजिक स्थितीवर भाष्य करतात. छत्रपती संभाजीनगरमधील महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी महाराष्ट्रातील जातीजातींमधील संघर्षाच्या मुद्द्याला हात घातला.
“प्रेक्षकांनी जात न विचारता भरभरून प्रेम दिलं”
प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. ते करत असताना त्यांनी कधी मला जात विचारली नाही, असं म्हणत नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच ते म्हणाले, “या प्रेक्षकांसाठी मी देखील प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला.”
माझ्या देशातील तरुणांकडून खूप अपेक्षा : नाना पाटेकर
नाना पाटेकर म्हणाले, “काही राजकारणी आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तू अमका, तू तमका असा ठपका ठेवून आपलं विभाजन करतात. आपण त्यांना उत्तर द्यायला हवं. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं असेल तर मतदानातून द्या. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आम्ही आता म्हातारे झालो आहोत. परंतु, तुम्ही बदल घडवू शकता. त्यामुळे सतर्क व्हा. गर्दीचा भाग बनू नका. इथल्या राजकीय व सामाजिक स्थितीत बदल घडवावा लागेल. तुम्ही हा बदल घडवणार नसाल तर कोण बदल करणार.”
