Sharad Pawar Tribute Nana Patekar Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नेते नाना पाटेकर यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मृत्यसमयी ते ७५ वर्षांचे होते. हरहुन्नरी कलाकार असलेले नाना सामाजिक भान जपणारे होते. त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार होता. नाना पाटेकर यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दुख व्यक्त केलं आहे. संवेदनशील व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने गमावला अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले”, असं शरद पवार म्हणाले.
“कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील”, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, शरद पवार गोव्यातच आहेत. ते महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने त्यांनी सिंधुदुर्गाचा दोन दिवसीय दौरा नियोजित केला होता. त्याकरता ते गोव्यात थांबले होते. मात्र, सकाळीच त्यांना अशी दुखद बातमी समजल्याने त्यांनीही हळहळ व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडूनही श्रद्धांजली
“अभिनयाचा एक युगपुरुष हरपला”, असं म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्या म्हणाल्या, “ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली. नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे.”
“कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे. या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
