अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला. २८ जानेवारी हा महाराष्ट्रसाठी काळा दिवस ठरला. येत्या महिन्याच्या २८ तारखेला अजित पवारांना जाऊन एक महिना पूर्ण होईल. अजित पवार यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह अनेकजण भावूक झालेले पाहण्यास मिळाले. आज संध्याकाळी अजित पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पवार कुटुंबासह दिग्गज नेतेमंडळी, कलाकार होते. अभिनेते नाना पाटेकर या वेळी भावूक झालेले पाहण्यास मिळाले.

राज्यातले दिग्गज नेते, कलाकार, उद्योजक शोकसभेला उपस्थित

अजितदादांच्या शोकसभेला देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते उद्योगपती आणि कलाकारांनीही उपस्थिती होती. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या शोकसभेत उद्योगपती गौतम अडानी आणि मुकेश अंबानी देखील उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांनी अजित दादांच्या आठवणींना खास उजाळा दिला. तसेच अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार नाना पाटेकरही शोकसभेत उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाना पाटेकर भावूक झाले.

नाना पाटेकर काय म्हणाले?

‘नमस्कार..माझा आणि दादांचा ५० वर्षांचा संबंध. दादा कार्यकर्ते होते. मी कधी बारामतीला गेलो, तर माझी सगळी उठबस दादा पाहत होते. अजित दादा तेव्हा १८-१९ वयोगटातील असतील, मी २५ आणि शरद पवार ३५ वयोगटातील असतील. ५० वर्षांचा खूप मोठा सहवास आहे. खूप जास्त आठवणी आहेत’, असं नाना पाटेकर म्हणाले. ‘आज या ठिकाणी इतकी मंडळी जमली आहेत, शोकसभेच्या ठिकाणी जर दादांचा आज ७५ वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो, तर जास्त बरं वाटलं असतं’, असं म्हणत नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या तसबिरीसमोर हात जोडले, तसेच व्यासपीठावरुन भावूक होऊन खाली उतरले. यावेळी उपस्थित मंडळीही भावूक झाल्याची पाहायला मिळाली.

नाना पाटेकर आणि अजित पवार यांचं नातं भावांसारखं

नाना पाटेकर आणि अजित पवार यांचा ऋणानुबंध वेगळाच होता. नाना पाटेकर अजित पवारांना अरे अजित अशी हक्काने हाक मारत असत. आज अजित पवार नसल्यानंतर मोठ्या भावाला जे लहान भाऊ सोडून गेल्यावर वाटेल तशाच भावना नाना पाटेकरांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांना फार बोलवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांनी आपले अश्रू आवरत अजित पवारांच्या तसबिरीला नमस्कार केला आणि स्टेजवरुन खाली उतरले. कॅमेरात ही दृश्यं कैद झाली आहेत.