Nana Patekar Tukaram Mundhe emotional statement : पाच दशकांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी सिनेरसिकांचं निखळ मनोरंजन करणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झालं. गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहत त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली असून त्यांच्याबरोबरची आठवण शेअर केली आहे. त्यांनी अंत्यदर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधला.

तुकाराम मुंढे म्हणाले, “नाना पाटेकर माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आमचं वारंवार बोलणं व्हायचं. आमचा शेवटचा संवाद अवघ्या एका आठवड्यापूर्वीच झाला होता आणि आम्ही नेहमीप्रमाणेच गप्पा मारल्या होत्या. तो संवाद खूप सुंदर होता. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल आणि माझ्या मुलांबद्दल विचारपूस केली, ते कसे आहेत हे विचारलं होतं. आणि त्यांचे शेवटचे शब्द होते, ‘लव्ह यू, बाळा.’ मला वाटतं की हे नानांचं एक वैशिष्ट्य होतं की, ते प्रत्येकावर प्रेम करायचे. “

“ते नेहमी आमच्यासोबत आणि माझ्यासोबत राहतील. आमची पहिली भेट २०१५ मध्ये झाली होती. तेव्हा मी सोलापूरचा जिल्हाधिकारी होतो आणि ते ‘नाम’ फाउंडेशनच्या कामासाठी तिथे आले होते. ते आले तेव्हा आम्ही माझ्या सोलापूरमधील शासकीय निवासस्थानी एकत्र जेवण केलं होतं. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात ते फोन करायचे आणि आमचं बोलणं व्हायचं. आमची वारंवार भेट होऊ शकली नाही, पण आमचा संवाद मात्र सातत्याने सुरू होता”, असं म्हणत त्यांनी एक खंतही बोलून दाखवली.

ते माझी मुलाखत घेणार होते

ते म्हणाले, “एक गोष्ट शेवटी अपूर्णच राहिली, ज्याचं आम्ही नियोजन केलं होतं. तारीख निश्चित झाली नव्हती, पण आम्ही एका जाहीर कार्यक्रमात एकत्र एकाच मंचावर येणार होतो, जिथे ते माझी मुलाखत घेणार होते. दुर्दैवाने, ते होऊ शकलं नाही.” हे शल्य तुकाराम मुंढेंच्या कायम मनात राहील.

तुकाराम मुंढेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

नाना पाटेकर यांच्या निधनाचं वृत्त समजताच तुकाराम मुंढे यांनी एक्सवर पोस्टही केली होती. तुकाराम मुंढे त्यांच्या समाजमाध्यमांतील पोस्टमध्ये लिहितात, ‘मी केवळ एका उत्कृष्ट कलाकारच नाही, तर एक असामान्य माणूस, एक जवळच्या मित्र गमावला आहे. एक अशी व्यक्ती ज्यांच्या उबदारपणाने आणि स्नेहाने त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाला स्पर्श केला. ​आम्ही अवघ्या आठ दिवसांपूर्वीच बोललो होतो. ते आमचे शेवटचे बोलणे असेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती.”

‘लव्ह यू, बाळा’ हे त्यांचे माझ्यासाठी शेवटचे शब्द होते. ​हे शब्द माझ्या उर्वरित आयुष्यात कायम माझ्यासोबत राहतील. काही माणसे आठवणी मागे सोडून जातात. तर काही मोजकी माणसे आपल्या आयुष्यात स्वतःचाच एक भाग सोडून जातात. नाना त्यांपैकीच एक होते, असं तुकाराम मुंढे म्हणाले.