नाम फाऊंडेशनचं काम हे एकाने केलेलं काम नाही. हे काम सामूहिक काम आहे, सगळ्यांची मेहनत यामागे आहे. कुठल्याही क्षेत्रात सामूहिक पद्धतीने केलेलं काम एकट्याने केलेल्या कामापेक्षा मोठंच असतं. आम्ही नाटकांमध्येही करतो ती सामूहिक मेहनत असते. एकट्याने जर केलं तर ती स्टँड अप कॉमेडी होते. ती काही वेळ होते त्याला फारसा अर्थ असतो. नाटक सामूहिक परिणाम करतं. आपल्याकडे इतक्या संस्था आहेत. मला वाटतं की सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. आपले काही राजकीय पक्ष नाहीत. सहकार्य करुन आनंद कुठला मिळतो? तर आनंद मिळतो हाच एकमेव आनंद त्यातून मिळतो. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या २५ व्या वर्षानिमित्त रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सोमवारी आयोजित जलक्रांती परिषदेत नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी नितीन गडकरींच्या समोरच महाराष्ट्र सोडायचा विचार करतो आहे असं वक्तव्य केलं आहे.
मी शहरांमध्ये राहू शकत नाही-नाना पाटेकर
गावाखेड्यात गेल्यानंतर आपल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर आपल्याला काय आणखी हवं? तेवढीच एक अपेक्षा आहे. नाटकात काम करत होतो तेव्हा मी तळगाळातून आलो होतो. दोन वेळच्या खाण्याचीही माझी भ्रांत होती. मला तिथे जाणं आवडतं. श्रीमंत मंडळींमध्ये वावरणं जमत नाही. मी शहरांमध्ये राहू शकत नाही. मी गावात किंवा खेड्यात राहतो. माझ्याकडे १० ते १२ गायी आहेत. पाच-पंचवीस कुत्री आहेत. १२ ते १४ एकर शेत आहे. तिथे उगवलेलंच मी खात असतो. आता त्या शेतात काही उगवलं नाही तर मला त्रास होतो. मला जर त्रास होत असेल तर कोरडवाहू शेतकऱ्याला किती त्रास होत असेल याची जाणीव मला होते. आम्ही आनंदासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टी केल्या नाहीत का? आम्ही आनंद मिळावा म्हणून सगळ्या गोष्टी करतो. पण मला शहरात गेल्यानंतर ज्या भिंती आहेत त्या आता मला आता कबरी वाटू लागल्या आहेत. तुझी कबर किती मोठी? हजार फुटांची आहे का? माझी दोन हजार फुटांची आहे. त्याची चार हजार, पाच हजार फुटांची. आभाळ पाहायचं ते देखील खिडकीएवढंच आभाळ आहे. मुंबईतल्या मित्रांना मी विचारतो गेल्या वेळी कधी आभाळ पाहिलंस तर ते मला सांगतात आम्हाला आभाळ पाहायला वेळच नाहीये. केवळ मी, माझं घर आणि घरातली चार मंडळी यापलिकडे विचारच होत नाही. नाटक-सिनेमातून मिळणारा सन्मान, पैसे यापेक्षा जास्त सन्मान मला नामच्या माध्यमातून मिळाला असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या डोळ्यांमध्ये भूक पाहिली-नाना पाटेकर
मकरंद अनासपुरे माझ्याकडे आला तेव्हा मी नव्या गाडीसाठी पैसे साठवले होते. ते सगळे पैसे मी त्यावेळी नाम फाऊंडेशनसाठी दिले. आपलं काही तरी कर्तव्य आहे म्हणून मी ते पैसे दिले. आपण काहीतरी केलं पाहिजे हे मला जाणवलं. माझ्यातला माणूस मेला होता, मला तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांत दिसला. त्यामुळे मी हे केलं. आपण खरंच मेलो आहे हे खरंच त्यांची भूक सांगत होती. त्यानंतर आम्ही बीडला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर एकावेल्यानंतर साधारण दोनशे मुली विधवा झाल्या होत्या. त्यातल्या मुलींचं जास्तीत जास्त वय २५ असेल. मला लक्षात आलं की एकदा मदत करुन हे संपणार नाही. त्यानंतर हे लक्षात आलं की या कामाला पूर्णविराम नाही. नाम फाऊंडेशन स्थापन झालं तेव्हा तीन महिन्यांत लोकांनी ६० कोटी रुपये दिले. आमच्यावर लोकांनी विश्वास दाखवला. त्यानंतर सातत्याने काम सुरु झालं. कुणालाही आत्महत्येचा विचार येत असेल तर एक फोन करा हा नंबर आम्ही दिला होता. आपल्या घरातलं कुत्रं, मांजर मेलं तरीही आपल्याला त्रास होतो घरातला कर्ता माणूस जाण्याचं दुःख किती मोठं असतं मी ते समजू शकतो. स्वामिनाथन आयोग हा देखील आता अंशतः चालू आहे. प्रत्येक गोष्टीला आम्हाला आंदोलन का करावं लागतं? भाजपा असेल काँग्रेस असेल प्रत्येकाची पुस्तिका, आचारसंहिता वेगळी असेल. पण आपलं तसं नाही. आपण सगळे एकाच विचारांचे आहोत असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सोडावा की काय? असा विचार करतोय-नाना पाटेकर
मरणावर विश्वास ठेवला की कळतं जगणं खूप छान आहे. फक्त संचय करत राहतात. अरे बारा मणच लाकडं लागणार आहेत. बाकी सगळं सोडून जावं लागणार आहे हे लक्षात घ्या. आपण जन्मल्यापासून श्वास घेतोय, देवाने निसर्गाने आपल्याकडे एकही रुपया मागितलेला नाही त्याचा. त्यामुळे निसर्ग चांगला ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.पाणी देखील वाया जाता कामा नये हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. आमच्या घरात सात भावंडं होतो आम्ही. सगळी गेली मी एकटाच राहिलोय. आई नाही, वडील नाहीत. मी नेहमीच म्हणतो माझ्या मुलांना की माझ्या बरोबरीचं कुणीच नाही. मला दरडावणारा, पाठीवर हात फिरवणारा कुणी नाही. गावांमध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध माणसाने गालावर हात फिरवला की वाटतं आई वडील भेटले पुन्हा. आपण फार तसे सुदैवी आणि दुर्दैवी आहोत. आपल्याला वेदना कळतात पण ती क्षणिक जाणीव होते. मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो आणि कुठे अगदी कुठे गावा-खेड्यात जाऊन, लोकांमध्ये जाऊन मला काही करता येईल का? माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत. एक छोटं गाव घ्यावं त्याचंच काहीतरी करावं. तिथेच आपले चार खांदे शोधावेत आणि तिथेच जावं असं वाटतं. वेगवेगळ्या विचित्र अशा आनंदाच्या कल्पना आहेत आमच्या असं नाना पाटेकर म्हणाले.
मी आईला नेहमी विचारायचो हिंदू आणि मुसलमान यांच्यातला फरक काय?
मी आईला नेहमी विचारायचो की मुसलमान आणि हिंदू यांच्यातला फरक काय? ती म्हणायाची काही नाही. आपण हात जोडून नमस्कार करतो ते हात उघडून नमस्कार करतात. आम्हाला हे शिकवलं गेलं. त्यामुळे आमच्यावर संस्कार झाले. जाती कधीही संपणार नाहीत. तुमची पात्रता काय त्याच्यावर आपली जात ठरते. आम्ही कधीही जात आणि धर्म विचारला नाही. जातीतला फरक हा सरतेशेवटी आपण ज्ञानाने, बुद्धिने पोहचलं पाहिजे. मला कुणीही माझी जात विचारली नाही. मी कुणाला सांगितलेलीही नाही. मी काय देतो तुम्हाला, कशी कला सादर करतो? ते महत्त्वाचं आहे असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
