तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारांनीच केलं, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.
हेही वाचा – “तो एबी फॉर्म योग्यच”; सत्यजित तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, पुरावेही केले सादर
काय म्हणाले नाना पटोले?
आज नाना पटोले यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांनी सत्यजीत तांबेंबाबत केलेल्या विधानासंदर्भात विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, अजित पवारांनी काय भूमिका मांडावी, हा त्यांचा विषय आहे. तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारांनीच केलं. मी बाळासाहेब थोरांताना सांगितलं होतं, मी नाना पटोलेलांना सांगितलं होतं, असं अजित पवारच म्हणाले होते. मुळात ज्या गोष्टी झाल्यात त्यावर पुन्हा चर्चा करण्यात अर्थ नाही. आज जनतेचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. भाजपाकडून देशात ज्या पद्धतीने न्यायव्यवस्था निर्माण केली जात आहे, ज्या पद्धतीने भाजपा या देशातील संविधानिक व्यवस्था संपवायला निघाली आहे, हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हाय व्होल्टेज राजकीय ड़्राम्यात आम्हाला फसायचं नाही, असेही ते म्हणाले.
माध्यमांनी यावरही बोलावं
यावेळी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल असं विचारलं असता? आमच्यात कोणताही वाद नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोणताच वाद नाही का? विखे आणि फडणवीसांमध्ये सर्व आलबेल आहे का? माध्यमांनी त्यांच्याकडेही लक्ष द्यावं, केवळ आमच्याकडे बघू नये, असे ते म्हणाले. आज देशात अदाणींनी एलआयसी लुटली, जनतेचा पैसा लुटला, माध्यमांनी यावरही बोलावं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – सत्यजीत तांबेंच्या आरोपावर नाना पटोलेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “या आरोपांबाबत…”
“कसबापेठसाठी रविवारी उमेदवार जाहीर होणार”
पुढे बोलताना त्यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीसंदर्भातही प्रतिक्रिाय दिली. या पोटनिवडणुकीसाठी अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नसून आम्ही सात इच्छूक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. उद्या रात्रीपर्यंत ही नावं जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोलेंच भाजपावर टीकास्त्र
यावेळी त्यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं. भाजपाने आज पिंपरी चिंचवड आणि कबसापेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, भाजपाने कसबापेठच्या जागेसाठी टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न दिल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या. यावरून नाना पटोले यांनीही भाजपाला लक्ष्य केलं. भाजपाची नियत योग्य नाही. गरज संपली की त्यांना फेकून द्या, अशी पद्धतीची भाजपाची भूमिका आहे. मुक्ता टिळक यांची तब्बेत खराब असतानाही त्या भाजपाला आवश्यकता असेल तेव्हा विधानसभेत मतदान करण्यासाठी येत होत्या. मात्र, आज भाजपाने ज्यापद्धतीने त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी नाकारली हे योग्य नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “मी…”
तांबेंच्या आरोपावर उत्तर देण्यास नकार
दरम्यान, यावेळी त्यांनी सत्यजीत तांबेंच्या आरोपाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तांबेंच्या आरोपांबाबत आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील, असं ते म्हणाले.