महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारत बंदच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. “केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

” १३० कोटी जनता वाऱ्यावर, केवळ २-४ उद्योगपती मित्रांचा फायदा”

नाना पटोले म्हणाले, “तीन कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. एका वर्षापासून हे आंदोलन सुरुच आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. कृषी कायदे, कामगार कायद्यात बदल करुन शेतकरी, कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकारच्या काळात फक्त दोन चार उद्योगपती मित्रांचा फायदा होत आहे. मात्र, १३० कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही.”

केंद्र सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने सक्रीय भाग घेतला. अकोल्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी रिक्षा चालवली. या रॅलीत अकोला शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजीद पठाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.  

“उद्या राज कुंद्रा भाजपामध्ये गेले तर ‘ते’ व्हिडीओ रामायणाचे होतील का?”, नाना पटोलेंचा सवाल

धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, हातकणंगले येथे आ. राजू आवळे, बुलढाणा येथे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला. चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नाशिक, लातूर, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी भारत बंदमध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticize modi government in protest to support bharat band by farmers pbs
First published on: 27-09-2021 at 18:27 IST