scorecardresearch

“सावरकरांच्या मुद्द्यावरून मविआत फूट पाडण्याचं विरोधकांचं षडयंत्र”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “यासंदर्भात लवकरच…”

सावकरांबद्दल काँग्रेस-शिवसेनेचे विचार वेगळे आहेत. काँग्रेस धर्माचा किंवा व्यक्तीचा द्वेष करत नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
नाना पटोले संग्रहित छायाचित्र

राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना माफी मागायला मी सावरकर नाही, गांधी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी सावकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं. दरम्यान, यावरून आता विविध राजकीय चर्चा सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

काय म्हणाले नाना पटोले?

“सावरकरांच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहेत. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काँग्रेस जात असतो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. तसेच सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे लवकरच चर्चा करतील”, अशी माहितीही त्यांनी दिली.

“त्यात नवीन काहीच नाही”

“देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठ्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. सध्या देश, लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे. ही लढाई मोठी असून भाजपाविरोधातील लढाईसाठी आम्ही एकत्र लढत आहोत. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – “…मग आता तुम्हाला बायको, मुलगी आठवली नाही का?”, शीतल म्हात्रेंचं जितेंद्र आव्हाडांवर टीकास्र!

“मविआत फूट पाडण्याचं विरोधकांचं षडयंत्र”

“सावरकर मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत. देशातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर भाजपा व मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच ते सावरकरांसारखे मुद्दे पुढे करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत. सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी देशात विषाक्त वातावरण निर्माण केले त्यातूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली, असे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीच म्हटलेले आहे”, असेही पटोलेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:56 IST

संबंधित बातम्या