Nana Patole On Eknath Shinde and Ajit Pawar : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं. मात्र, त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं. त्यामुळे शिंदे यांनी भाजपाकडे अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठं भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपाच करणार”, असं वक्तव्य नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांचे नगरसेवक फुटण्याची भिती आहे असं वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “आम्ही मागेच म्हटलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपा करणार. आता अजून खूप घडामोडी घडतील. सध्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. यातच सध्या दिल्लीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना आदेश सुरू आहेत की मुंबईत भाजपाचाच महापौर होईल आणि त्यामध्ये कोणाचंही ऐकलं जाणार नाही वैगेरे, अशा बातम्या मी पाहत आहे. पण अजून मोठे गेम होणार आहेत”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

‘आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार’

“महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार आहेत. मी तुम्हाला हे देखील सांगतो की महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचीच सत्ता पाहिजे असं वातावरण आहे. फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं. मग लोक बरोबर करतील”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

‘शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपा करेल’

“शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजपा करेल आणि केला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी अजित पवारांची मालकी होती. आता ही मालकी कुणाकडे गेली? तिकडे नवी मुंबई, ठाण्यातही तसंच आहे. त्यामुळे भाजपा काय करणार होतं? हे मी पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे अजून आणखी खेळ समोर आहे, आणखी ८ दिवस थांबा, थोडे दिवस थांबल्यानंतर आणखी घडामोडी घडतील”, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.