Nana Patole On Maharashtra Politics : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून अनेक घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच शिंदे यांनी भाजपाकडे मुंबईत अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सुरू असलेल्या घडामोडींवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होतील’, असं नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नाना पटोलेंनी काय म्हटलं?
मुंबईत सुरू असलेल्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “आम्ही मागेच म्हटलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपा करणार, आता अजून खूप घडामोडी घडतील. सध्या मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. यातच दिल्लीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना आदेश सुरू आहेत की मुंबईत भाजपाचाच महापौर होईल आणि त्यामध्ये कोणाचंही ऐकलं जाणार नाही वैगेरे, अशा बातम्या मी पाहत आहे. पण अजून मोठे गेम होणार आहेत”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
‘आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार’
“महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार आहेत. मी तुम्हाला हे देखील सांगतो की महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचीच सत्ता पाहिजे असं वातावरण आहे. फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं. मग लोक बरोबर करतील”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
‘शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपा करेल’
“एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजपा करेल आणि केला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी अजित पवारांची मालकी होती. आता ही मालकी कुणाकडे गेली? तिकडे नवी मुंबई, ठाण्यातही तसंच आहे. त्यामुळे भाजपा काय करणार होतं? हे मी पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे अजून आणखी खेळ समोर आहे, आणखी ८ दिवस थांबा, थोडे दिवस थांबल्यानंतर आणखी घडामोडी घडतील”, असं मोठं भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.
