हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात हिंदुत्त्वाचा गवगवा करणारे रथयात्रा काढतात. मात्र, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढली असून प्रभू श्रीराम यांच्यानंतर अशी पदयात्रा काढणारे राहुल गांधी हे भारताच्या इतिहासातली चौथी व्यक्ती असल्याचे ते म्हणाले. रत्नागिरी दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर नितीन गडकरींचं स्पष्ट विधान, म्हणाले…

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

देशाचा तिरंगा सुरक्षित राहावा, यासाठी राहुल गांधीनी देशात काश्मीर ते कन्याकुमार पदयात्रा काढली आहे. देशात आज जे लोक हिंदुत्त्वाचा गवगवा करतात, त्यांना मला सांगायचे आहे, की प्रभू श्रीराम यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढली होती. त्यानंतर शंकराचार्य आणि रामदास स्वामींनी अशी पदयात्रा काढली. त्यांच्यानंतर आता काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा करणारे राहुल गांधी हे चौथी व्यक्ती आहेत. त्यावरून धर्माचे पालन कोण करते आहे हे दिसून येत आहे. भाजपावाले गाडीतून रथयात्रा काढतात, हे सर्व महाराजे बनले आहेत. मात्र, राहुल गांधी पदयात्रा काढत देशाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाने आज एकत्र येणं ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजापाने राहुल गांधींच्या टीशर्टवरून केलेल्या टीकेलाही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चीनवरून मास्क, कचरा एकंदरितच चीनची चमचेगिरी करणारे आज सत्तेत बसले आहेत. त्यांना राहुल गांधीच्या टीशर्टबाबत काय मिरची झोंबली हे कळत नाही, राहुल गांधींच्या पदयात्रेला घाबरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान

यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्र सोडले. महाराष्ट्रात तमाशा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. गुवाहाटी प्रकरणानंतर महाराष्ट्राची देशात बदनामी झाली आहे. हा महाराष्ट्र शाहू-फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र राहिला आहे. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारने ज्याप्रकारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे, ते कोणालाही नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना भेटायला जातात, जे सरकार असंवैधानिक आहे. त्यांची केस सरन्यायधिशांच्या खंडपिठाकडे आहे, ते जर सरन्यायधिशांची भेट घेत असेल, तर नागरिकांनी कोणाकडे बघावे, असेही ते म्हणाले.