scorecardresearch

MLC Election 2023 : भाजपाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीला मदत? नाना पटोलेंच्या विधानानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “अनेक नेत्यांनी…”

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले.

DEVENDRA FADNAVIS AND NANA PATOLE
देवेंद्र फडणवीस, नाना पटोले (संग्रहित फोटो)

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या निवडणुकीत शिंदे गट-भाजपा पिछाडीवर आहे.अमरावीत मतदारसंघासाठी अद्याप मतमोजणी सुरूच आहे. या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. तर नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा विजय झाला आहे. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाकडून दुसऱ्यांचे घर फोडण्याच प्रयत्न केला जातो. आता त्यांचे घर फुटले आहे. या निवडणुकीत आम्हाला भाजपाच्या अनेकांनी मदत केली, असे नाना पटोले म्हणाले. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >> विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “उधार-उसनवारी करुन एक…”

“भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचे घर तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. हाच त्रास आमच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांनी आमचा एक नेता नेला. पुढच्या काळात नाशिकमधून मी काँग्रेसचे पन्नास आमदार निर्माण करेन. तशी रणनीती आम्ही तयारी केली आहे. त्या रणनीतीमध्ये आम्हाला यश येईल,” असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नागपूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे सुधाकर अडबाले यांचा विजय झाला या विजयावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “विदर्भ हा पहिल्यापासून काँग्रेसचाच गड राहिलेला आहे. मात्र चुकीच्या समन्वयामुळे आम्ही मागे पडत गेलो. यावेळी काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी हे युद्ध एकदिलाने लढवले. खासदार राहुल गांधी पदयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या यात्रेला मराठवाडा, विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. या यात्रेमुळे लोकांमध्ये काँग्रेसबाबत उत्साह निर्माण झालेला आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:55 IST