काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण नाना पटोले यांच्यावर पक्षातील काही मोठ्या नेत्यांचा एक गट नाराज असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. एकाच पक्षातील दोन वरिष्ठ नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करताना दिसले. तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दिली जाऊ शकते असंही बोललं जात आहे.

दरम्यान, या सर्व चर्चा आणि अफवांचं आज (२९ मे) नाना पटोले यांनी खंडण केलं. एका पत्रकार परिषदेदरम्यान, नाना पटोले यांना विचारण्यात आलं की, तुमच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारी गेल्या आहेत. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावर काय सांगाल. या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे.

हे ही वाचा >> “अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”

नाना पटोले म्हणाले, मी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असेन. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आता पडदा पडला आहे. या सर्व गोष्टींना काँग्रेस पक्षात स्थान नाही. आम्ही सर्वजण सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कशा जिंकता येतील याच्या योजनांवर काम करत आहोत. तसेच मी प्रसारमाध्यमांचे आभार मानेन, कारण गेल्या काही दिवसात या चर्चांमुळे तुम्ही माझ्या नावाला खूप प्रसिद्धी दिली आहे. परंतु या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या सगळ्या बातम्या केवळ सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. कुठलाही नेता माध्यमांसमोर काहीही बोललेला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole says i will president maharashtra congress till lok sabha vidhan sabha elections asc
First published on: 29-05-2023 at 19:58 IST