scorecardresearch

केंद्राचं अपयश लपवण्यासाठी भाजपा राज ठाकरेंसारख्या लोकांचा वापर करुन…; राज यांच्या सभेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं भाषण केलं त्याच पद्धतीचं राज यांचं भाषण होतं. जनतेच्या मूळ प्रश्नावर बोलतील अशा अपेक्षा होत्या.”

congress MNS BJP
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना साधला निशाणा (फाइल फोटो)

महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात दिलेल्या तीन तारखेच्या अल्टीमेटमचा उल्लेख केला. तसेच तीन तारखेनंतर दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. राज यांच्या याच भूमिकेवर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया नोंदवताना राज यांना टोला लगावतानाच केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीवरही निशाणा साधलाय.

राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एक मे रोजी झालेल्या सभांमध्ये सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती असं म्हणाले. “खरं तर आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं भाषण केलं त्याच पद्धतीचं राज यांचं भाषण होतं. जनतेच्या मूळ प्रश्नावर बोलतील अशा अपेक्षा होत्या,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला. पुढे बोलताना, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठेही कामात येणार नाही. महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न थांबवावा,” असं आवाहन नाना पटोलेंनी केलंय.

“धार्मिक वाद सुरु केलाय तो काही बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी हा वाद योग्य नाही,” असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. “काँग्रेस पक्ष धार्मिक वादात पडू इच्छित नाही. पडणार पण नाही. काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार आहे. जी महागाई आहे, बेरोजगारी वाढलीय. शेतकऱ्यांचे, गरीबांचे प्रश्न घेऊन काँग्रेस लढेल. या लोकांना न्याय मिळून देणे ही आमची भूमिका आहे,” असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. चार तरखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन करण्यात आल्याप्रकरणी बोलताना, “यासाठी शासन सक्षम आहे. राज्य सरकार कारवाई करायला सक्षम आहे,” असं नाना पटोलेंनी म्हटलं.

राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना, “भाजपाच्या वतीने केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे सुरु झालंय. यापद्धनं अशा (राज ठाकरेंसारख्या) लोकांचा वापर करुन धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरु झालाय तो चुकीचा आहे. या भूमिकेमुळे आता राज्यातील जनता भाजपाला माफ करणार नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झालीय,” असा टोला नाना पटोलेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole slams raj thackeray and bjp after aurangabad sabha scsg

ताज्या बातम्या