‘Why I Killed Gandhi’ चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याची नाना पटोलेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

या चित्रपटावरून सध्या मोठं राजकीय वादंग निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटावरून सध्या मोठं राजकीय वादंग निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा अभिनय असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन सध्या नवा वाद सुरु झालेला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही यास विरोध होऊ लागला आहे.

‘Why I Killed Gandhi’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यात चित्रपटगृहात व ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्याबाबत असा पत्रात विषयाचा उल्लेख केला आहे.

पत्रात म्हटले आहे की, “फॅसिस्ट विचाराचे नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या केली. याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचाराचे चित्रपट निर्माता ३० जानेवारी २०२२ रोजी गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारा Why I Killed Gandhi हा चित्रपट प्रदर्शित करू पाहत आहेत.”

“महात्मा गांधीजींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळख गांधीजींच्या नावाने होते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून दाखवून दिले. म्हणूनच जगभर ते परम पूज्यनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून संपूर्ण जगभरात पाळला जातो. एकीकडे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस अहिंसा आणि शांतता म्हणून पाळला जात असताना दुसरीकडे अशांतता, द्वेष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणार, Why I Killed Gandhi हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, यामुळे फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल.”

“कोणत्याही घृणास्पद अमानवीय कृत्याचं उदात्तीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. म्हणून हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृह व ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्याबाबत काँग्रेस पक्षाची मागणी असून, ती मान्य करण्यात यावी ही विनंती.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patoles letter to cm thackeray demanding ban on why i killed gandhi screening msr

Next Story
करोना झाल्याचं कळताच मोदींचा फोन, शरद पवारांची माहिती; म्हणाले “काळजी आणि शुभेच्छा…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी