नांदेड : नांदेडमध्ये खुदबेनगर ते वाजेगाव जाणाऱ्या पुलाजवळ एका दुचाकीतून स्फोटसदृश आवाज होऊन त्यावरील तरुणाचा जळून मृत्यू झाला. ही घटना रमजान ईदच्या दिवशीच शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

या घटनेच्या चित्रफिती, छायाचित्रे समाजमाध्यमांत प्रसारित होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वाराला उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पूर्णपणे जळाल्याने त्या तरुणाची ओळख सायंकाळपर्यंत पटलेली नव्हती. दुचाकीस्वारासह दुचाकीने पेट घेतल्यानंतर त्यात स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानंतर हा अपघात होता की, घातपाताचा प्रयत्न होता याचा तपास पोलीस करीत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, दहशतवाद विरोधी पथक तसेच न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावर पोहचून घटनेची माहिती घेतली. विशेष म्हणजे या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. दुचाकीतून स्फोटाचे सहा ते सात आवाज समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या चित्रफितमध्ये दिसत आहेत. ते स्फोट पेट्रोल टाकीचे होते की अन्य कशाचे होते, याचा तपास केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी जळणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार हा खुदबेनगर येथून इदगाहपासून वाजेगाव गावकडे जात असताना ही घटना घडली. घटनेच्या वेळी इदगाह मैदानावर हजारो लोक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. त्यामुळे तेथील नागरिकांना ही घटना समजल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेच्या संदर्भात पोलिसांना विचारले असता, या घटनेचा अपघात आणि घातपात या दोन्ही बाजूने तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले. मृत तरुणाची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. काही माहिती पोलिसांना मिळाली; पण ती अद्याप उघड करण्यात आली नाही.

नांदेड हादरले

रमजान ईददिवशीच नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे. नांदेड शहरात यापूर्वी गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या असून, गँगवार समोर आलेले आहे. शनिवारच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जळून मृत झालेल्या तरुणाची ओळख पटवणेही पोलिसांसमोर आव्हान आहे.