नांदेड : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन येत्या सोमवारी साजरा करण्याची तयारी राज्यभर सुरू असताना या पक्षाच्या नांदेड जिल्हा व महानगर कार्यालयाच्या रखडलेल्या; पण आता महिनाभरापासून सुरू झालेल्या बांधकामाची माहिती समोर आली. अर्धवट कामे पूर्ण करून सुसज्ज कार्यालय निर्माण करण्याची जबाबदारी आता खा.अशोक चव्हाण यांच्यावर सोपविली गेली आहे.

तसेच त्यांच्याच निकटच्या वर्तुळातील नामांकित कंत्राटदाराकडे उर्वरित काम पूर्ण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यावर टाटा समूहातील एका कंपनीवर गुणवत्ता तपासण्याचे काम सोपविण्यात आले आहे. १९८० साली भाजपाची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने नांदेड जिल्ह्यातील संघटन वाढविण्यासाठी लोकवर्गणीतून पक्षासाठी निधी उभा केला होता.

त्या काळात सुमारे सव्वा लाख रूपये पक्षाने नांदेडमध्ये बँकेत गुंतविले आणि या ठेवीच्या व्याजातून पक्षाचा कारभार पुढे नेला. आज ४६ वर्षांनंतर हा पक्ष आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आणि भक्कम झाला असून नांदेड कार्यालयाची उभारणी, अंतर्गत सजावट व अन्य बाबींसाठी सुमारे १० कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्हा कार्यालयासाठी १० वर्षांपूर्वी पक्षाने सुमारे एक एकर जागा खरेदी केली होती. हिंगोली मार्गावरील ह्या जागेवर सुमारे १३ हजार चौरस फूट बांधकाम केले जाणार आहे. २०१९ साली पक्षातर्फे खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यालय बांधकामाच्या विषयात मोठा उत्साह दाखविला होता. २०२२ साली त्यांच्याच हस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

तत्कालीन महानगराध्यक्ष प्रवीण साले व त्यांच्या पत्नीच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली; पण चिखलीकरांच्या खासदारकीच्या कार्यकाळात बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. अशोक चव्हाण यांनी २०२४ साली आपल्या अनेक समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हा वरील कार्यालयाची काही स्थापत्य कामे पूर्ण झाली होती. पक्षामध्ये स्थिर झाल्यानंतर चव्हाण यांनी एकदा या अर्धवट बांधकामासह संपूर्ण परिसराची पाहणी केली होती.

नंतरच्या काळात लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीमुळे कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचा विषय मागे पडला होता; पण आता अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात झाली असून सर्व कामे पूर्ण करून सुसज्ज कार्यालय उभारणीच्या विषयात खा.चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

माजी आमदार राम पाटील रातोळीकर हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष असताना २०१६ साली एका खाजगी व्यक्तीकडून वरील जागा १ कोटी रूपयांस खरेदी करण्यात आली. चिखलीकर यांच्या काळात बांधकाम मार्गी लावण्याचा विषय आला तेव्हा जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांनी कार्यालय बांधकामाच्या खर्चात आपले योगदान द्यावे, असे सुचविण्यात आले होते; पण तेव्हाच्या आणि सध्याच्या किती आमदारांनी पक्ष कार्यालयाच्या बांधकामास हातभार लावला, याची माहिती मिळू शकली नाही.

मधल्या काळात काही जणांची देणी थकीत होती. ती आता नव्या व्यवस्थेत मार्गी लावण्यात येणार आहेत. मागील एक महिन्यापासून बांधकामास पुन्हा सुरुवात झाली आहे. खा.चव्हाण यांच्या वर्तुळातील माधवराव एकलारे यांच्यावर उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची यंत्रणा तेथे कार्यरत झाली असून सर्व कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी टाटा समूहातील कंपनीचा एक अभियंताही बांधकामस्थळी उपस्थित असतो, असे सांगण्यात आले. या संपूर्ण कामाचे वास्तुविशारद नांदेड शहरातीलच आहेत. तेही कामाकडे लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात आले.