नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या ३ एप्रिल रोजी संपणार असून तत्पूर्वी या मंडळाची मासिक सभा ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर पुढील व्यवस्थेबाबत सहकार विभागाकडून अद्याप कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही; पण या मंडळाला मुदतवाढ देऊ नका, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेले बँकेतील संचालक मंडळ २०२१मध्ये सत्तारुढ झाले. मागील दोन वर्षांत या बँकेने संचित तोटा भरून काढत प्रदीर्घ कालावधीनंतर बँकेच्या वार्षिक ताळेबंदात तोटा निरंक करून निव्वळ नफ्याची नोंद केली. त्यानंतर येत्या ३१ मार्च रोजी संपणार्‍या आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या निव्वळ नफ्यात घसघशीत भर पडण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

मागील पाच वर्षांत पहिली अडीच वर्षे वसंतराव चव्हाण यांनी या बँकेचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर या पदाची सूत्रे खतगावकर यांच्याकडे आली. या संचालक मंडळाची मुदत संपत असतानाच बँकींग कायद्यातील नव्या दुरूस्तीनुसार संचालकपदाची दहा वर्षे पूर्ण करणार्‍या आठ विद्यमान संचालकांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागणार असली, तरी त्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. बँक प्रशासनाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चे धोरण स्वीकारले आहे. कारण विभागीय सहनिबंधकांकडून याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत.

विद्यमान संचालक मंडळाच्या अखेरच्या पर्वात बँकेमध्ये रिक्त असलेल्या पदांपैकी १५६ पदे भरण्यासाठी जोरदार हालचाली झाल्या; पण त्यांतील संभाव्य गैरप्रकार आधीच निदर्शनास आल्यानंतर शासनाच्या सहकार विभागाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात भरती प्रक्रिया थांबविल्यामुळे अनेक संचालकांचे मनसुबे उधळले गेले. भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींनी या संचालक मंडळाविरुद्ध मुख्यमंत्री तसेच सहकारमंत्र्यांकडे तक्रारी केल्यामुळे या संचालक मंडळाची मोठी कोंडी झाली. या मंडळाची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्याच एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना अलीकडे पत्र पाठवून या संचालक मंडळास मुदतवाढ न देता जिल्हाधिकारी अथवा अन्य समकक्ष अधिकार्‍याची प्रशासकपदी नियुक्ती केली जावी, अशी मागणी केली. त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक तयारी सुरू!

नांदेड बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत असतानाच सहकार विभागाने संचालक मंडळाची निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत मतदारयादी तयार व्हावी, यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे. १५ जूनपूर्वी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज बँकेतील एका जबाबदार अधिकार्‍याने व्यक्त केला.

आठ जणांना सक्तीची विश्रांती!

संचालकपदाची दहा वर्षे पूर्ण होणार्‍यांमध्ये विद्यमान अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर, प्रताप पाटील चिखलीकर, दिनकर दहिफळे तसेच नागेश पाटील आष्टीकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब रावणगावकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर या आठ जणांचा समावेश आहे. आगामी निवडणूक त्यांना लढवता येणार नाही, असे सांगण्यात आले.