नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारातून काही प्रस्थापित नेत्यांना ५ वर्षांसाठी सक्तीची विश्रांती घ्यावी लागल्यानंतर बँकेच्या आता होत असलेल्या निवडणुकीत काही दिवंगत व काही हयात नेत्यांच्या वारसदारांसह खासदार-आमदारही उतरले आहेत. नव्या संचालक मंडळात महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सामान्य शेतकरी आणि कार्यकर्ता मात्र उमेदवारांच्या यादीमध्ये कोठेही दिसत नाहीत.

बँकेच्या निवडणूक कामकाजातील नामनिर्देशन पत्रांच्या (अर्ज) छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाल्यानंतर वैध ठरलेल्या अर्जदार उमेदवारांची यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली. खा.अशोक चव्हाण यांनी या बँकेवर आपल्या समर्थकांचा वरचष्मा राखण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचे दाखल झालेल्या अर्जांमधून दिसून आले.

स्वतः चव्हाण बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ मतदारसंघातून (अर्धापूर तालुका) उतरतील, असा अंदाज होता; पण ते उमेदवारीच्या भानगडीत पडले नाहीत. या तालुक्यातून त्यांनी अनुभवी बी.आर.कदम यांना संधी दिली आहे; पण त्यांचे पुनर्वसन होणार का, ही बाब अद्याप स्पष्ट नाही. चव्हाणांच्या गटाचे उमेदवार होण्यासाठी अनेक जण इच्छुक होते व आहेत. त्यांतील काहींना चव्हाण यांनी अर्ज भरण्याची सूचना दिली, तर अनेकांना त्यांनी ‘चकवा’ दिला आहे. मुदखेडमधील भाजपाचे निष्ठावान मागासवर्गीय कार्यकर्ते प्रवीण गायकवाड हे त्यांतील ठळक उदाहरण.

सेवा सहकारी संस्था प्रतिनिधींसाठी १६ तालुक्यांत १६ जागा असून उर्वरित ७ जागांसाठी ९० उमेदवार सध्या रिंगणात आहेत. या सात जागांवर वर्चस्व राखण्याचा चव्हाणांचा प्रयत्न आहे. भाजपाच्या भीमराव केराम, डॉ.तुषार राठोड आणि राजेश पवार या तीन आमदारांनी त्यांच्या सोयीच्या मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत. आ.पवार यांची पत्नीही निवडणूक रिंगणात आहे. आ.चिखलीकर यांनी आपल्या हक्काच्या दोन जागांपैकी एका जागेवर मुलीला-प्रणिता देवरे यांना, तर दुसर्‍या जागेवर समर्थकास संधी दिली आहे.

माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या पारंपरिक जागेवर स्नुषा डॉ.मीनल पाटील यांना तर मोहन पाटील टाकळीकर यांनी चिरंजीव मुकेश पाटील यांना उभे केले. खासदार रवींद्र चव्हाण आणि शिवकुमार भोसीकर हे दोघे मागील संचालक मंडळात वडलांच्या रिक्त झालेल्या जागेवर वारसदार म्हणून आले. त्यांनीही पुन्हा अर्ज भरला आहे. उमेदवारांमध्ये वारसदारांची भाऊगर्दी लक्षणीय आहे. निवडणुकीतून बाद झालेल्या खा.नागेश आष्टीकर यांनी मुलाचा अर्ज दाखल केल्याचे दिसते.

माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांचे पुत्र राजेश देशमुख (नायगाव), माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे पुत्र लक्ष्मण, डी.बी.पाटील होटाळकर यांचे बंधू शिवराज (नायगाव), माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचे बंधू ज्ञानेश्वर (किनवट), बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र कैलास (उमरी), माजी खासदार वसंतराव चव्हाण यांचे बंधू श्रीनिवास (नायगाव), माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांचे पुत्र राजेंद्र, रोहिदास चव्हाण यांचे पुत्र नवनाथ अशी वारसदारांची मोठी यादी आहे. मारोतराव कवळे (उमरी) यांनी स्वतःसह पत्नीला धर्माबादमध्ये उभे केले आहे.

खा.रवींद्र चव्हाण यांचे साहाय्यक दत्ता येवते यांनी महिलांच्या दोन जागांसाठी पत्नीला उभे केले आहे. नायगावचा चव्हाण परिवार त्यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार का, याकडे संबंधितांचे लक्ष आहे. २ जागांसाठी तब्बल २३ महिला अर्जदार असून अनेकजणी प्रस्थापित कुटुंबातील आहेत. आ.राजेश पवार यांनी आपला अर्ज ‘ओबीसी’ प्रवर्गातून भरला. याच मतदारसंघात त्यांच्या चुलत भगिनीचाही अर्ज आहे.

प्रस्थापितांसाठी नवोदितांवर घाव!

जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी चालविली जाणारी संस्था म्हणून ओळखली जाते. पण विविध गटांच्या नेत्यांनी खर्‍याखुर्‍या शेतकर्‍याला संचालक मंडळात स्थान देण्याची संवेदनशीलता कोठेही दाखविली नाही. काही प्रस्थापितांना संचालक मंडळात सामावून घेण्यासाठी नवोदितांच्या आशा-आकांक्षांवर घाव घालण्याची नेपथ्यरचनाही सुरू झाली आहे.