नांदेड : शेतकरी अनुदानात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेत शासनाने चौकशी पथके स्थापन केली आहेत. मागील पाच वर्षांत अनुदान वाटपाची तपासणी ही पथके करणार असून, एका जिल्ह्याचे पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तपासणी करणार आहे, हे विशेष. पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गतवर्षी अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पीक मातीमोल होऊन शेतकरी नागवला गेला. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले. परंतु, यापैकी ५० कोटी रुपयांचा अपहार झाला असून, तलाठी आणि ग्रामसेवकांनीच ते उचलून खाल्ले, अशा तक्रारी व आरोप केला जात आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेत शासनाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी चौकशी पथके नियुक्त केली आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एका जिल्ह्याचे पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन चौकशी करणार आहे. कोणत्या पथकाने कोणत्या जिल्ह्यात जाऊन चौकशी करायची हे शासनाने ठरवून दिले आहे. या पथकाचे प्रमुख अपर जिल्हाधिकारी असतील. शिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी हे या पथकाचे सदस्य असणार आहेत. उर्वरित आवश्यक कर्मचारी वर्ग पथकाने निवडायचा आहे.

सदर चौकशी पथकाने मागील पाच वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदाना संदर्भात सखोल तपासणी करणे अभिप्रेत आहे. अनुदान मयत व्यक्ती, शेतकरी नसलेले व्यक्ती, शासकीय तसेच अकृषीक जमिनीवर शेती दाखवून अनुदान वितरीत केलेले व्यक्ती, एका पेक्षा अधिक वेळा अनुदान वितरित केलेले व्यक्ती हे मुद्दे समोर ठेवून चौकशी करावयाची आहे. शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित केलेले अनुदान त्यांच्याच खात्यात जमा झाले की कसे, हे देखील तपासणे अभिप्रेत आहे. याबाबत गावनिहाय अभिलेख्यांची व याद्यांची तपासणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंगोलीचे पथक नांदेडला येणार

तपासणीमध्ये पारदर्शिता राहावी या उद्देशाने एका जिल्ह्याचे पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तपासणी करणार आहे. हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथक नांदेडला येणार असून, या पथकात हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तेथील जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी (खर्च) यांचा समावेश असेल. तर अशाच धाटणीचे नांदेडचे पथक हिंगोलीला जाऊन चौकशी करणार आहे. दरम्यान, याबाबत नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत अद्याप माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.