नांदेड: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, गुरुवार (दि. २) नांदेड शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये धडक तपासणी करण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले असून, तब्बल २ लाख ३४ हजार ३३० रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अन्नपदार्थांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी शिल्पा श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली व्ही. एस. लोंढे, अरुण तम्मडवार, अमृता दुधाटे आणि अ. नं. गिरी यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या पथकाने प्रथम बाबानगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील पोषण आहार विभागाची तपासणी केली. तेथील आहाराच्या दर्जाबाबत संशय आल्याने रिफाइंड सोयाबीन तेल, सोया वडी, तांदूळ आणि तूर डाळीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यासोबतच शाळेतील ३९८ किलो सोया वडी, २,९९८ किलो तांदूळ, ९९८ किलो तूर डाळ असा एकूण २ लाख २४ हजार ५३० रुपयांचा उर्वरित अन्नसाठा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच जप्त केला.
त्यानंतर वसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालयाला भेट दिली. तेथेही पोषण आहाराची तपासणी करत सोया वडी, तांदूळ आणि मूग डाळीचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ९८ किलो सोया वडीचा (किंमत ९ हजार ८०० रुपये) साठा जप्त करण्यात आला.
अहवालानंतर होणार कठोर कारवाई
“दोन्ही शाळांमधून घेतलेले अन्नपदार्थांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे
