छत्रपती संभाजीनगर : नांदेड व हिंगोली जिल्ह्यास भूकंपाचा धक्का बसला असून रिश्चर स्केलवर त्याची तीव्रता ४.७ एवढी नोंदविण्यात आली असून त्याची खोली १० किलोमीटर एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड शहरात हा धक्का ८.४५ बसला. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे सांगण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील शिंदे पांगरा हे भूकंपाचे कंद्रस्थान असल्याचे सांगण्यात येत आहे.

 हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अनेक घरांना तडे गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अगदी माझ्या घरालाही तडा गेला आहे. काही गावातील सार्वजनिक सभागृहांना तसेच मंदिरांना  तडे गेले आहेत. संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आता फक्त प्राथमिक माहितीच हाती आली आहे. शिंदे पंगारा हे गाव केंद्रस्थानी आहे की नाही हेही अद्याप नक्की नाही. कारण केंद्र असेल त्या भागात नुकसान कमी असते. पण भूकंपाचा धक्का मोठा होता.  हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात नुकसान अधिक असू शकते असे सांगण्यात आले.

 एमजीएम अंतराळ संशोधन केंद्राचे श्रीनिवास औंधकर म्हणाले, मराठवाड्यातील सर्वात मोठा भूंकप ६.४ रिश्चर स्केलचा होता. त्यानंतरचा हा भूकंप मोठा असल्याचे दिसून येत आहे. अनेक घरांना तडे गेले आहेत. भूकंप होताच अनेक घरावरचे पत्रे हलले. घरातून भांडीही खाली पडल्याचे सांगण्यात आले. अनेक घरांना तडे गेले आहेत. ’  गेल्या महिन्यातही हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का बसला होता.