नांदेड : लेंडी हा आंतरराज्य प्रकल्प नव्या नियोजनानुसार पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात १९५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. तेलंगणा राज्याकडून २१८ कोटी रुपयांचा निधी येणे बाकी असून, तो निधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सर्व संबंधितांची बैठक येत्या ११ ऑगस्ट रोजी निश्चित झाली आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर समोर आली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत खासदार अशोक चव्हाण आणि संबंधित आमदारांना टाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सिंचन प्रकल्पांच्या विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर ठरविलेल्या बैठका दोनदा रद्द झाल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच विषयावर बैठक घेत पवार यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पक्ष विस्तारासाठी स्पर्धा लागलेली आहे. त्यातूनच आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत केवळ त्याच लोकप्रतिनिधींस आमंत्रित करून बैठका लावण्याचा प्रकार उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात दोन वेळा केला होता; पण त्या बैठका अचानक रद्द झाल्यानंतर राज्यसभा सदस्य अजित गोपछडे गेल्या आठवड्यामध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील लेंडी आंतरराज्य प्रकल्पाच्या विषयावर जलसंपदा मंत्र्यांना एक बैठक घ्यावयास लावली. हा प्रकल्प ज्या भागात होत आहे, त्या भागाचे दोन्ही आमदार भाजपाचे असले, तरी त्यांना तसेच ज्येष्ठ नेते खासदार अशोक चव्हाण यांनाही टाळून वरील बैठक मुंबईत झाली.
मुंबईमध्ये मंत्रालय किंवा सह्याद्री विश्रामगृहात होणाऱ्या बैठकांचे वृत्त सरकारी विभागातर्फे घोषित होते; पण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीचे वृत्त खासदार गोपछडे यांच्या स्थानिक यंत्रणेने माध्यमांकडे पाठविल्याचे दिसून आले. या बैठकीवर मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी थेट भाष्य केले नाही. पण वरील बैठक आणि तिची प्रसिद्धी म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार असल्याचे आमदारांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लेंडी प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्यांच्या आवश्यक त्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. धरणाच्या बांधकामासाठी लागणारा निधी मुख्यमंत्र्यांनी आधीच मंजूर केलेला आहे. घळभरणीचे काम नुकतेच सुरू झालेले आहे. त्यावर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत, ही वस्तुस्थिती आमदारांच्या समर्थकांनी शुक्रवारी येथे समोर आणली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प व अन्य प्रश्नांवरची बैठक आयोजित करण्याबाबतची सूचना गेल्या महिन्यात जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयालाच दिली होती. त्या बैठका पवार यांनीच अचानक रद्द केल्यानंतर जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी आपल्याच कार्यालयात स्वतंत्रपणे बैठक आयोजित केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा बैठक घेण्यास वाव राहिलेला नाही, असे सांगितले जात आहे. मंत्रालयातील अशा बैठकांतून महायुतीतील बेबनाव आणि असमन्वय समोर येत आहे.
लेंडी हा आंतरराज्य प्रकल्प नव्या नियोजनानुसार पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात १९५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. तेलंगणा राज्याकडून २१८ कोटी रुपयांचा निधी येणे बाकी असून, तो निधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सर्व संबंधितांची बैठक येत्या ११ ऑगस्ट रोजी निश्चित झाली आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर समोर आली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.