Medical student Akanksha Gaikwad commits suicide in Nanded hostel : नांदेड शहरातील सिडको परिसरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणी सिडको परिसरातील जीवन घोगरे पाटील यांच्या वसतिगृहात राहत होती. त्याच वसतिगृहात तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. जीवन घोगरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश सचिव असून मृत तरुणीच्या पालकांनी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. थकीत शुल्कावरून तिला मानसिक त्रास दिला जात असल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आंकाक्षा गायकवाडचे वडील काय म्हणाले?

आकांक्षा गायकवाड असं या तरुणीचं नाव असून तिचे वडील मुजाजी गायकवाड म्हणाले, “माझी मुलगी आकांक्षा गायकवाड  शामराव कदम होमिओपॅथ‍िक महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. या महाविद्यालयाच्या समोर असलेल्या जीवन घोगरे पाटील यांच्या इमारतीत ती भाड्याने राहत होती. मला एक दीडच्या सुमारास कॉल आला की तुमच्या मुलीने फाशी घेतली. मी तिथे पोहोचल्यावर मला फाशीचा अंदाज आला नाही. पण तिला मारून लटकवण्यात आलं असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत याप्रकरणाचा छडा लागत नाही, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही.”

“ती खूप हुशार होती, त्यामुळे ती आत्महत्या करूच शकत नाही. तिनेच काही दिवसांपूर्वी एका मुलीचा जीव वाचवला होता. माझी २५ वर्षांची मुलगी आत्महत्या करू शकत नाही. तिचा घातपात झालेला आहे. तिला मारून लटकवण्यात आलं आहे. जीवनराव घोगरे यांची इमारत आहे. तिथे कोण आलं, कोण गेलं याची चौकशी करून गुन्हेगारांवर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही मातंग समाजातील आहोत, त्यामुळे आरोपींविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही”, असंही मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितलं.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. पुढील तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली. दरम्यान, या वसतिगृहात ४० ते ४५ मुली राहत होत्या, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

मृत आकांक्षाच्या पालकांनी वसतिगृह चालक जीवन घोगरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार घोगरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत.