नांदेड ः नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यान चौकात गावठी पिस्टल व खंजर बाळगणार्‍या दोन आरोपींना भाग्यनगर पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले आहे. नांदेड शहरात मागील आठवड्यात लगातार ७० तासात पाच खून झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी विशेष पोलीस पेट्रोलिंग सुरू केली आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास माता गुजरीजी चौकात आरोपी खुशालसिंघ नानकसिंघ गिल (वय ३२) रा.नंदीग्राम सोसायटी, जयमीतसिंघ बलबीरसिंघ शाहू (वय २२) रा.अबचलनगर या दोघांकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी या दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल व दोन खंजर मिळाले आहेत. पोलिसांनी ते वापरत असलेली दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.