नांदेड: येथील वजिराबाद पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी व स्टेट बँक ऑफ इंडियातील रोकड व्यवस्थापक आदित्य प्रकाश सेनगावकर याचे राजस्थानातील भरतपूर येथील एका रुग्णालयात निधन झाल्याची माहिती शनिवारी येथे प्राप्त झाली. नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी या माहितीला दुजोरा दिला. प्राथमिक माहितीनुसार त्याने आत्महत्या केली नसल्याचेही सांगण्यात आले.
आदित्य सेनगावकर व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतील जीवन माधवराव जगदाळे यांच्यावर पंधरवड्यापूर्वी फसवुणकीचा गुन्हा दाखल झाला होता. बँकेच्या या शाखेमध्ये तारण (गहाण) ठेवलेल्या अस्सल सोन्याच्या जागी बनावट सोने ठेऊन या दोघांनी संगनमताने सुमारे ८५ लाख रूपयांचा अपहार केला होता. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आरोपींपैकी जीवन जगदाळे पोलिसांच्या हाती तेव्हाच लागला; पण गुन्हा दाखल होण्याआधीच आदित्य सेनगावकर नांदेडमधून बेपत्ता झाला होता.
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याआधी त्याच्या पत्नीने आपले पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांत एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी आदित्य सेनगावकरचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा बराच प्रयत्न केला. तो परराज्यात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते; पण शनिवारी सकाळी त्याच्या बाबतीत खळबळजनक माहिती समोर आली. त्यानुसार तो राजस्थानातील भरतपूर येथे पोहोचला होता. तेथे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तो एका रुग्णालयात दाखल झाला. तेथेच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
भरतपूर पोलिसांना आदित्य सेनगावकरच्या बॅगेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे ओळखपत्र सापडले. त्यावरून त्यांनी माहिती काढत बँकेच्या स्थानिक अधिकार्यांना आवश्यक ती माहिती कळविली. आदित्यची आई आणि पत्नी मागील काही काळापासून छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहेत. त्यांना व इतर नातेवाईकांना वरील माहिती समजल्यानंतर सेनगावकर परिवारातील काही जण राजस्थानला गेल्याचे येथे सांगण्यात आले. या फरार आरोपीचे निधन झाल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाकडे शनिवारी सकाळपर्यंत नव्हती; पण दूपारनंतर पोलीस अधीक्षकांनीच वरील माहितीस दुजोरा दिला.
वरील फसवणूक प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असला, तरी मुख्य आरोपीच्या अकाली निधनामुळे त्याला वेगळे वळण लागले आहे. आता आदित्य वगळून इतर आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे स्थानिक पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
