नांदेड: आगामी नववर्षात पुण्यामध्ये होणार्या शंभराव्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी राज्यात आणि राज्याबाहेरील ‘ ‘नांदी ’ संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेने स्वतंत्र चूल मांडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून महामंडळाच्या आगामी बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
अ.भा.मराठी साहित्य महामंडळाची बैठक १९ ऑगस्ट रोजी दूरदृश्य प्रणालीव्दारे होणार आहे.या बैठकीसमोर महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचा विषय असला,तरी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिनिधींकडून ‘नांदी ’ संमेलनाच्या आयोजनावरुन निर्माण झालेल्या संभ्रमाचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.
अ.भा मराठी साहित्य संमेलन महामंडळाच्या अधिपत्याखाली होणार असल्यामुळे त्याच्या वातावरण निर्मितीचे उपक्रम महामंडळाच्या चार घटक संस्थांच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी होणे अपेक्षित आहे ; पण पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने अन्य तीन घटक संस्थांशी समन्वय न राखताच ; नांदी संमेलनाचा आराखडा निश्चित केल्याचे काही दिवसापूर्वी समोर आले. या उपक्रमातील पहिले संमेलन १४ ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये पार पडले.
या पार्श्वभूमीवर आता महामंडळाची बैठक होत असल्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेने घेतलेल्या भूमिकेवर अन्य दोन घटक व इतर संलग्न संस्थांचे प्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे. या विषयात महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांचे नेमके धोरण वरील बैठकीत स्पष्ट होईल, असे महामंडळाच्या एका सदस्याने येथे सांगितले.
शेषराव मोरे यांचा नकार
शंभराव्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ.शरणकुमार लिंबाळे यांच्यासह कांही ज्येष्ठ साहित्यकांची नावे चर्चेत आली असून त्यात मराठवाड्यातील कवयित्री अनुराधा पाटील तसेच नांदेडचे प्रा.शेषराव मोरे ही दोन नावे समोर आली आहेत.यासंबधी एक वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संमेलनाचे अध्यक्षपद स्विकारण्यास मोरे यांनी नकार दिला.ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यीकातून अध्यक्ष निवडला जावा अशी भूमिका त्यांनी मांडली. मोरे सोमवारी ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
