सोशल मीडियावर सध्या एका पेक्षा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, आता चक्क भारतीय रेल्वेच्या एसी डब्यातून एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एका नवविवाहित जोडप्यासाठी चालत्या ट्रेनचा फर्स्ट क्लास एसी कूप चक्क ‘हनिमून’साठी सजवण्यात आलाय. फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि आकर्षक रोषणाईने सजलेल्या या ‘सुहागरात एक्सप्रेस’चा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दक्षिण मध्य रेल्वेनं कर्तव्यात कसुर केल्याबद्दल संबंधित तिकीट तपासनीसाला (TC) तातडीने निलंबित केलं असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘सुहागरात एक्सप्रेस’मध्ये नक्की काय घडलं?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी हे नवविवाहित जोडपे ट्रेन क्रमांक ११००२ नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करत होते. या जोडप्याने आपल्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी एका खाजगी डेकोरेटरला ऑनलाइन बुक केले होते. ही ट्रेन जालना स्थानकावर पोहोचली असता, तो डेकोरेटर ट्रेनमध्ये शिरला आणि त्याने संपूर्ण कूपचा कायापालट केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या डेकोरेटरला ट्रेनमध्ये प्रवेश देणे पूर्णपणे बेकायदेशीर होते.
सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वेचा तो फर्स्ट क्लास एसी डबा एखाद्या आलिशान हॉटेलसारखा सजवलेला दिसत आहे. डब्यात रंगीबेरंगी फुगे, सुगंधी फुले, गुलाबाच्या पाकळ्या, एलईडी फेअरी लाईट्स आणि लाल रंगाचे पडदे लावण्यात आले होते. इतकेच नाही तर बर्थजवळ ‘आय लव्ह यू’ असा संदेशही लिहिण्यात आला होता, तर बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी ‘हार्ट शेप’ही तयार करण्यात आला होता. डब्याची पूर्ण जमीन गुलाबाच्या पाकळ्यांनी भरून गेली होती.
नेटीझन्समध्ये दोन गट; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच नेटीझन्समध्ये दोन गट पडले आहेत. काही जणांनी याला एक ‘रोमँटिक’ आणि सुंदर सरप्राइज म्हटले आहे. तर दुसरीकडे, सुज्ञ नागरिकांनी रेल्वेच्या सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चालत्या ट्रेनमध्ये अशा प्रकारे ज्वलनशील वस्तू किंवा सजावटीचे साहित्य वापरणे आणि अनोळखी व्यक्तीने थेट ट्रेनमध्ये येऊन सजावट करणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रशासनानं काय कारवाई केली?
हा प्रकार समोर आल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने याला ‘मोठी सुरक्षा चूक’ मानलं आहे. कर्तव्यावर असलेल्या टीसीनं त्या डेकोरेटरला ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखायला हवे होते, असे रेल्वेने म्हटले आहे.
“या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित तिकीट तपासनीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुरू असून, अहवाल आल्यानंतर पुढील कडक कारवाई केली जाईल. तसेच विनापरवाना ट्रेनमध्ये प्रवेश करणाऱ्या त्या खाजगी डेकोरेटरवरही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेमधील प्रवाशांची सुरक्षा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे.
