जिल्हा आरोग्य अधिकारीपदासह २९ पदे रिक्त
कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू या समस्यांनी विळखा घातलेल्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद १० महिन्यांपासून रिक्त आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ातील सहापैकी चार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून २९ प्राथमिक आरोग्य केंद्रात गट अ आणि ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही रिक्त असल्याचे समोर आले आहे.
आरोग्य व्यवस्थेशी बहुसंख्य महत्त्वपूर्ण पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. पालकमंत्री असूनही जिल्ह्य़ाकडे फारसे न फिरकणाऱ्या गिरीश महाजन यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हा वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा गाडा हाकणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांकडून काम भागविले जात आहे. याशिवाय अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे एक आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चार पदे नऊ वर्षांपासून रिक्त आहेत. साथरोग अधिकाऱ्याचे एक पदही १० महिन्यांपासून रिक्त असून कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या या रिक्त पदांमुळे कामकाज पुरते कोलमडले आहे.
ओहवा, वडफळी, चुलवड, जांगठी, तोरणमाळ, सारंगखेडा, रोषमाळ, राजविहीर, सोन बुद्रुक, सुलवाडा, मंदाणे, धनाजे बुद्रुक, खुंटामोडी या दुर्गम भागांतील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात गट अ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा, जिल्ह्य़ातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील गट ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकटय़ा आरोग्य विभागात ३६ प्रमुख पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
हे कमी म्हणून की काय जिल्ह्य़ातील सहा वैद्यकीय अधिकारी अनधिकृतपणे गैरहजर असून नऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रतिनियुक्तीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. या सर्व कारभारामुळे शासनाच्या नवसंजीवन योजना, मानव विकास कार्यक्रम अशा विविध योजनांवर परिणाम होत आहे.
ही सर्व पदे वारंवार मागणी करूनही भरली जात नाहीत. विशेष म्हणजे ज्या एकमेव अतिरिक्त आरोग्य अधिकारी असलेले डॉ. बी. बी. नागरगोजे यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार आहे, त्यांचीही दोन महिन्यांपूर्वीच बदली झाली आहे.
अद्याप त्यांच्या जागी कोणत्याही अधिकाऱ्याचंी नियुक्ती झालेली नाही. असा सर्व ‘रिक्त’चा खड्डा असलेल्या जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेचा विस्कटलेला कारभार पुन्हा रुळावर कसा येणार, असा प्रश्न सर्वाना पडला आहे.