विधानसभा निवडणुकीनंतर साधारण महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचे सरकार आले आहे. मात्र, या सरकारवर भाजपा नेते नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. या सरकारने सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती देण्याचेच काम केले असल्याने या सरकारला ‘स्थगिती सरकार’ असं त्यांनी संबोधलं आहे. शिवाय हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही. काही महिन्यांच पाहुणं सरकार आहे. असं देखील त्यांनी पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

निवडणुकीनंतर बराच दिवसांनी मी पत्रकारपरिषद बोलावली आहे. पत्रकारपरिषदेत मुख्यतः राज्यातील परिवर्तन किंवा बदल आणि या बदलामुळे कोकणाच्या विकासावर होणारा परिणाम याचबरोबर सिंधुदुर्गांतील ठप्प झालेली विकास कामं, यावर प्रकाश टाकण्यासाठी ही पत्रकारपरिषद असल्याचे त्यांनी सुरूवातीला स्पष्ट केले.

यानंतर राणे म्हणाले, महाराष्ट्रात २८ नोव्हेंबर रोजी, नवीन सरकारचा शपथविधी झाला. आज ८ डिसेंबर आहे. मात्र आजपर्यंत खातेवाटप होऊ शकलेलं नाही. एवढच नाहीतर मंत्री देखील ठरलेले नाही. तीन पक्षांच मिळून जे सरकार अस्तित्वात आलं आहे, त्या सरकारला मी नावं दिलं आहे ते म्हणजे ‘स्थगिती सरकार’. कारण या सरकारने मागील दहा दिवसांत एकच काम केलं आहे व ते करत आहेत. मेट्रोसासरखी अन्य विकासकामं जी राज्यात सुरू आहेत. या विकासकामांना स्थगिती देण्याचं काम, या सरकारने मागील दहा दिवसांत केलं आहे. त्यामुळे विकासकामं बंद पडलेली आहेत, ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे हे सरकार राज्यात प्रगतीसाठी अस्तित्वात आले नसून, कामं बंद करायची ठेकादारांकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व चालेलं आहे. हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही. काही महिन्यांच पाहुणं सरकार आहे.

कोकणात या सरकारचं अस्तित्व अद्याप कुठं दिसत नाही. कोकणातील विकास कामं ठप्प झालेली आहेत. याला संपूर्णपणे जबाबदार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र आले ते जनेसाठी किंवा शेतकरी, कामगार उद्योजक यांच्या हितासाठी आलेले नसून ते केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच विकासावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदाराने आढावा बैठका घेतल्या, खासदार अशा आढावा बैठक कोणत्या अधिकारात घेतो, केंद्रात भाजपाच सरकार असून त्यामध्ये शिवसेना नाही. सत्तारूढ पक्षाचा खासदार नसताना, शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसे काय दिले जाऊ शकतात? केवळ बेकायदेशीररित्या बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय. ही जनतेची फसवणूक आहे. आगामी १५ ते १८ ऑक्टोबर रोजी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यात गाव भेटी घेणार आहोत. जनतेला या निडवणुकीत भाजपा सरकार का स्थापन करू शकलं नाही, तीन पक्षांच सरकार कसं योग्य नाही, राज्याला अधोगतीकडे नेणारं हे सरकार आहे ही माहिती दिली जाणार आहे. तसेच या सरकारने पर्यटन क्षेत्राच्या ज्या योजनांना स्थगिती दिली आहे, त्याविरोधात आवाज उठवला जाईल, असा देखील राणे यांनी यावेळी इशारा दिला.