…म्हणून मी यापुढे स्वत: सोबत एक टेप ठेवणार : नारायण राणे

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची काही विधानं वाचून दाखवली आणि आपण देशप्रेमापोटी केलेल्या विधानावरुन एवढा मोठा वादंग उठला, असंही बोलून दाखवलं.

What I was saying was that anger came Question by Narayan Rane
फोटो – PTI

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद दोन दिवसांनंतर आजही पाहायला मिळत आहे. या विधानावरुन शिवसेना-भाजपा वाद, राणेंवर गुन्हा दाखल, त्यांना अटक, मग जामीन, सुटका असा नाट्यमय प्रकार महाराष्ट्राला पाहायला मिळाला. काल रात्री राणेंची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची काही विधानं वाचून दाखवली आणि आपण देशप्रेमापोटी केलेल्या विधानावरुन एवढा मोठा वादंग उठला, असंही बोलून दाखवलं. आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, “माझ्या देशाचा स्वातंत्र्यदिन ज्याला माहित नाही आणि त्यांनी चेष्टा करावी. म्हणून माझ्या तोंडून ते वाक्य आलं. पप म्हणून माझ्याबद्दल, भाजपाच्या नेत्यांबद्दल, देशाबद्दल कोणी काही बोलेल तर मी ऐकून घेणार नाही. मी ऐकून घेणाऱ्यांपैकी नाही. आणि म्हणून मी माझी बाजू मांडली. पुढच्या वेळेपासून मी टेपपण सोबत ठेवणार आहे. काही वाक्यांचा विपर्यास केला जातो. तो होऊ नये म्हणून. आता जपून पावलं टाकली पाहिजेत आणि म्हणून तसा प्रयत्न होईल”.

काय म्हणाले होते नारायण राणे?

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, खळबळजनक विधान केलं होतं. विशेष म्हणजे भर पत्रकारपरिषदेत राणेंकडून असं विधान करण्यात आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं होतं. रायगडमधील महाड येथे आज केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं होतं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती”, असं राणे म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narayan rane clears his side overn statement about uddhav thackeray vsk

ताज्या बातम्या