एका कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अकस्मात धावती भेट झाल्याने अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला रामराम करणार या राजकीय चर्चेला उधाण आले. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली. मात्र शिंदे यांनी संयमी प्रतिक्रिया नोंदवली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदेंच्या बाजूला उभं राहून याच विषयावर दिलेल्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्र्यांना हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का; राज्यपालांना पाठवलं पत्र, राज्यपाल कोश्यारींनी ‘ती’ मागणी केली मान्य

शिंदे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणेही उपस्थित होते. या भेटीनंतर राणे यांच्या घराबाहेरच दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचा एक गट तुमच्यासोबत येणार आहे अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचीही चर्चा आहे. याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “खरं म्हणजे काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. सभागृहात मी बोललोय. त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच अन्य एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही जे आधी व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे असं म्हटलं.

नक्की वाचा >> गणपती दर्शनासाठी CM शिंदे नारायण राणेंच्या घरी; दर्शनानंतर भेटीदरम्याच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांच्या…”

याच विषयावर पुढे नारायण राणेंनी प्रतिक्रिया नोंदवताना जर काँग्रेसचे नेत आले शिंदेसोबत तर ते शिवसैनिक होतील असं म्हटलं. “ते काँग्रेसवाले म्हणून येत नाही. ते शिंदेंच्या शिवसेनेत येत आहेत. ते शिवसैनिक होणार. उलट ते चांगलं काम करत आहेत,” असं राणेंनी सांगितलं. तसेच राणे यांना, ते हिंदुत्वाची भूमिका स्वीकारणार याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. “ते काँग्रेसचे राहणार नाहीत. एकतर ते शिंदेंकडे शिवसैनिक म्हणून जातील किंवा भाजपामध्ये येतील. उरलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ,” असं राणे म्हणताच शिंदे हसू लागले.

नक्की वाचा >> दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे दोन्ही शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसतील का? राणेंसमोरच शिंदे म्हणाले, “तुम्हाला एकदम…”

१२ ते १३ काँग्रेसचे लोक जाणार आहेत अशी चर्चा आहे. तर ठाकरेंना झटका दिल्यानंतर काँग्रेसला झटका देण्यासाठी भाजपा काही मोहीम लावत आहे का? असा प्रश्न राणेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर राणे यांनी, “भाजपा मोहिम नाही करत कृती करते,” असं उत्तर दिलं.