एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षाचे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होणार आहेत. मेळावे यशस्वी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. आमच्याच मेळाव्याला जास्त गर्दी होणार असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. दरम्यान, शिवसेनेच्या या दोन दसरा मेळाव्यांची चर्चा सुरू असतानाच अन्य पक्षीय नेतेही यावर मत व्यक्त करत आहेत. भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले असून आमंत्रण आल्यास उपस्थित या मेळाव्यास राहणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण…”, उदयनराजेंची खोचक शब्दांत टीका

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण आल्यास उपस्थित राहणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, आम्हाला आमंत्रण आले तर नक्कीच दसरा मेळाव्यास उपस्थित राहू. उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही बाजूने आमंत्रण आले तर उपस्थित राहणार. मात्र ते मला आमंत्रण देणार नाहीत याची मला खात्री आहे, असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा >>> अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

दरम्यान, येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि आमच्याच दसरा मेळाव्यास लोकांची उपस्थिती असेल, असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. हा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी दोन्ही गटातील नेतेमंडळी कामाला लागलेले आहेत. आपापल्या मतदारसंघातून लोकांची गर्दी जमवण्यासाठी सर्व आमदार नियोजन करत आहेत. शिंदे गटाचा मुंबईतील बिकेसी तर उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane comment on uddhav thackeray dussehra melava presence prd
First published on: 03-10-2022 at 17:32 IST