गेल्या काही दिवसांपासून राज्यात नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन चाललेल्या गदारोळावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही पण पक्ष राणेंच्या पाठीशी उभा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता भाजपा नेते गिरीश बापट यांनी मात्र नारायण राणे यांना टोला लगावला आहे. राजकीय नेत्यांनी बोलताना पथ्य पाळायला हवं, अशा शब्दात त्यांनी राणेंना घरचा आहेर दिला आहे.

माध्यमांशी बोलताना भाजपा खासदार गिरीश बापट म्हणाले, मला असं वाटतं की राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षांच्या सर्व नेत्यांनी बोलताना पथ्य पाळली पाहिजेत. सामान्य जनतेला हे आवडत नाही. जे सामान्य जनतेला जे आवडतं, जे चांगलं आहे ते आपण करायला हवं. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा जनतेत जाऊन जनतेची कामं आपण करु. मुख्यमंत्री असो किंवा नारायण राणे यांनी आपापली मतं मांडायला आमची हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात आणि मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे आपण सगळ्यांनी टाळलं पाहिजे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, खळबळजनक विधान केलं होतं. विशेष म्हणजे भर पत्रकारपरिषदेत राणेंकडून असं विधान करण्यात आल्याने, सर्वत्र चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं होतं. रायगडमधील महाड येथे केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असं राणे म्हणाले होते.