राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद! नाशिक, सांगली, चिपळूणमध्ये सेना-भाजपा आमने-सामने

राज्यभर राणेंच्या मुख्यमंत्र्यांबद्दलच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. नाशिकसह चिपळूण, सांगली, औरंगाबाद, मुंबईमध्ये देखील शिवसैनिकांची आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत.

Narayan Rane Controversial statement consequences Sena BJP clashes across Maharashtra gst 97
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचे तीव्र पडसाद राज्यभर दिसू लागले आहेत. (Photo : ANI)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. जुन्या नाशिकमध्ये भाजपाचं वसंत स्मृती हे मोठं कार्यालय आहे. भाजपाच्या कार्यालयावर शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. त्याचसोबत, यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा संतप्त इशारा देखील शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.

नाशिक पोलिसांकडून या प्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, नारायण राणे यांना आजच अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे. राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक चिपळूणच्या दिशेने रवाना झालं आहे. दरम्यान, नाशिकसह चिपळूण, सांगली, औरंगाबाद, मुंबईमध्ये देखील शिवसैनिकांची आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत.

चिपळूणमध्ये सेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

चिपळूणमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे. राणे यांची जन आशीर्वाद चिपळूणमध्ये आल्यानंतर आता भाजपा आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी आक्रमकता दिसून आली आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. राणेंच्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच बहादूर शेख नाका परिसरात हा सर्व प्रकार सुरु असताना पाहायला मिळल आहे. दरम्यान, दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सांगलीमध्ये राणेंच्या पोस्टरला फासलं काळं

शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलेला असताना दुसरीकडे सांगलीत देखील शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. राणेंच्या पोस्टरला काळं फासून शिवसेनेकडून आपला निषेध नोंदवण्यात आला आहे.  इथे देखील राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे.

आमच्या देवाला जर कोणी आव्हान देईल तर…! मुंबईत युवासेना आक्रमक

मुंबईत देखील शिवसेनेची आक्रमकता मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. जुहू परिसरात युवासेनेचे तीव्र आंदोलन पाहायला मिळत मिळालं आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. “आमच्या देवाला जर कोणी आव्हान दिलं तर युवासैनिकही त्याच पद्धतीने उत्तर देईल”, असा टोकाचा इशारा आता युवासेनेच्या वरुण सरदेसाई यांनी दिला आहे. खरंतर नितेश राणेंनी याच पार्श्वभूमीवर रात्री एक ट्विट करत थेट शिवसेनेला सिंहाच्या गुहेत येण्याची हिंमत न करण्याचं आव्हान दिलं होतं. “युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहूमधील घराबाहेर गोळा होण्यास सांगण्यात आल्याचं ऐकलं. मुंबई पोलिसांनी त्यांना इथे येण्यापासून थांबवावे किंवा त्यांनी थांबवलं नाही तर जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल. सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत,” असं ट्विट नितेश राणेंनी केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narayan rane controversial statement consequences sena bjp clashes across maharashtra gst