नव्या महाविकास आघाडीला बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही अनुमती दिली नसती. शिवसेनेची विचारधारा हिंदुत्त्ववादी आणि मराठी माणसाची आहे. उद्धव ठाकरेंनी त्याला मूठमाती दिली अशी टीका भाजपा नेते नारायण राणे यांनी केली. ” आता आघाडीचे नेते जे काही बोलले ते उद्धव ठाकरेंना मान्य करावे लागेल. जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केलं नसतं ” असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी ही टीका केली.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आधी नीट बसू देत, त्यांच्या कार्यकौशल्यावर आत्ताच भाष्य करणार नाही. त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा आहे. या नव्या आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत अशीही टीका नारायण राणे यांनी केली. ” काँग्रेसमध्ये दुफळी आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे आत्तापासूनच हे सरकार स्थिर सरकार होईल असं म्हणणं चुकीचं ठरेल. ” बहुमत सिद्ध करणं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि भूमिका बजावू असंही राणे यांनी म्हटलं आहे.

भाजपाने कायदेशीर आणि घटनेला धरुन मार्गाने सरकार बनवण्याचे प्रयत्न केले होते. मला पक्षातील केंद्रीय नेत्यांनी विचारलेले नाही आणि माझी विधान परिषदेत जाण्याची तयारी नाही. मी माझ्या स्टाईलने या सरकारला घेरण्याचे काम करेन असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.