राज्यात आज अहमदनगर येथे अत्यंत खळबळजनक अशी घटना घडली. एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. तर, या घटनेवरून भाजपा नेते आक्रमक झाले असून, राज्य सरकारसह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी देखील पत्रकरापरिषदेत अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

“एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे माहिती नाही, ही अवस्था एसटीची आहे. एसटी बसेसची अवस्था तर अशी झाली आहे की खरंतर त्यांना रस्त्यावर आणण्याची परवानगी नसली पाहिजे. खरंतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्याने कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, कलेक्टर आहे तो शिवसेनेचा.” असं केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना म्हणाले आहेत.

या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज नगरमधील एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या, यापूर्वी २८ एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या, अनियमित वेतनाच्या समस्या, त्यामुळे कर्मचार्‍यांचे अतोनात हाल या सार्‍याच बातम्या अत्यंत वेदनादायी आहेत. राज्य सरकारने या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित त्याचे निराकरण करावे! ” असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या घटनेवरून महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.“एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगायचं तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी वैफल्यानं आत्महत्या करत आहेत. आतातरी सरकार जाग होणार आहे की नाही? जर एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकारचं असेल.” असं दरेकर म्हणाले आहेत.