scorecardresearch

राणेंनी एकही उद्योग वर्षभरात आणला नाही ; वैभव नाईक यांचे प्रतिपादन

राणे यांना केंद्रात दिलेले मंत्रिपद हे निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी दिलेली आहे असा आरोप श्री नाईक यांनी केला.

सावंतवाडी  : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्योग व रोजगार देण्याची क्षमता संपली असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक मेळाव्याला ४०० लोकही आले नाहीत. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे कणकवलीतील औद्योगिक महोत्सव पूर्णत: फसला असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली येथे केली.   कणकवली येथील विजय भवनमध्ये नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर उपस्थित होते. ते म्हणाले, राणे हे यापूर्वी राज्य सरकार मध्ये उद्योगमंत्री होते. मात्र त्यांनी जिल्ह्यात उद्योग आणले नाहीत. त्यामुळे राणेंवर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास राहिला नाही. राणे यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक महोत्सवाला जनता व त्यांच्याच पक्षाचे लोक का उपस्थित राहिले नाही? याचा विचार राणेंनी केला पाहिजे. सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला ४० हजार लोकांनी भेट दिली. मात्र ५० लाख रुपये खर्च करून राणे यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक महोत्सवाला ४०० लोकांनी देखील भेट दिली नाही. असा खरमरीत टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला. केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे यांनी गेल्या एक वर्षांत जिल्ह्यात एकही उद्योग आणलेला नाही. राणे यांना केंद्रात दिलेले मंत्रिपद हे निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी दिलेली आहे असा आरोप श्री नाईक यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला यामुळे कळून चुकले आहे की राणे या जिल्ह्यात रोजगार निर्माण करू शकत नाहीत. आणि जिल्ह्याचा विकास पण करू शकत नाहीत. राणे हे केवळ शिवसेनेवर आरोप करण्यापुरते उरले आहेत. त्यामुळे येत्या काळात सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून किंवा अन्य विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास केला जाईल असेही नाईक यांनी यावेळी सांगितले. राणे नेहमी सांगतात की मी उद्योजक आहे. मात्र जिल्ह्यातील जनतेला मी आवाहन करेन की, उद्योजक म्हणून राणे यांचा आदर्श कुणीच घेऊ नये. कारण त्यांनी आतापर्यंत काय उद्योग केले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेत. अशी खरमरीत टीका नाईक यांनी केली. नेहमीच इतरांवर टीका करण्याचा राणेंच्या भूमिकेमुळे त्यांचा दोन वेळा पराभव झाला. लोक उद्योग किंवा औद्योगिक क्षेत्रात येण्यास तयार आहेत, पण हा औद्योगिक महोत्सव राणेंनी घेतल्यामुळे त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. असा टोला  नाईक यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narayan rane did not bring any industry in maharashtra during the year says vaibhav naik zws