शासनाने राज्यात विशेषत: जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असून, सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला मान्यता शासनाने दिल्याने स्वतंत्र मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण, बंदरे, अन्न व नागरीपुरवठा, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे दिला. सिंधुदुर्गचे सुपुत्र असणारे रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना येथील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली आदी उपस्थित होते. शासनाने ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्र्वभूमीवर नागपूर येथे ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. आरोग्यविषयक अडचणी दूर करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे म्हणून सरकारने विशेषत: प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे असे चव्हाण म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून शासनाची मान्यता असणाऱ्या या महाविद्यालयावर शासनाचे नियंत्रण असेल असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

बंदरविकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धोरणात २०१६ची पॉलिसी आणली आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करून बंदराशेजारील भागातील आर्थिक सुधारणा करण्यासाठी शासन निर्णय घेत आहे. त्यानुसारच बंदर विकास होईल, असे सांगताना रेडी पोर्टबाबत नवीन बदलेले धोरण राबवू, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. तुरडाळ रेशन दुकानावर उपलब्ध करून दिली जात आहे. गौरी-गणपती सणाच्या पाश्र्वभूमीवर कोकणवासीयांना रेशन दुकानावरील पुरवठय़ाबाबतचा योग्य निर्णय घेण्यात येईल, असे  रवींद्र चव्हाण म्हणाले. यावेळी भाजपाने आनंद नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर, राजू गावडे, विलास सावंत, शैलेश तावडे, परिणीती वर्तक, अमित परब तसेच शिवसेनेचे प्रकाश परब, अशोक दळवी, राघोजी सावंत, दीपक सोनुर्लेकर व मान्यवरांनी स्वागत केले. तळवडेचे भाचे असल्याने चव्हाण यांचा प्रकाश परब यांनी शाल देऊन सत्कार केला. बांदा, वेत्ये, मळगाव, नेमळे, केसरी, कोलगाव येथेही स्वागत करण्यात आले. या वेळी राजेंद्र म्हापसेकर, यशवंत आठलेकर, प्रभाकर सावंत व भाजपचे पक्षश्रेष्ठी उपस्थित होते.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane get permission for medical college in sindhudurg district
First published on: 16-07-2016 at 01:47 IST