सावंतवाडी: अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे झालेले नुकसान हे वास्तव असून, त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासनाने आतापर्यंत दिलेली मदत ही पहिली आणि शेवटची नसून, नुकसान भरपाईत वाढ करण्याबाबत आम्ही पुन्हा विचार करू, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केले.

सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य करत विरोधकांचा समाचार घेतला. ​खासदार राणे म्हणाले की, कोकणातील सर्व खासदार, आमदार आणि मंत्री बागायतदारांना अधिक भरपाई मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बैठक घेऊन ठराविक रक्कम मंजूर केली आहे, मात्र बागायतदारांच्या हितासाठी यात आणखी वाढ व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.

राजू शेट्टींना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येत्या १५ मे रोजी मुंबईत काढल्या जाणाऱ्या मोर्चावर भाष्य करताना राणे म्हणाले, “राजू शेट्टी हे माझे चांगले मित्र आहेत. पण ते शेती, धंदा किंवा ठोस राजकारण करण्याऐवजी फक्त आंदोलनेच करतात. त्यांना मी याबद्दल चांगला सल्ला देईन.”

​राहुल गांधी  यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले की, या नेत्यांना जागतिक अर्थव्यवस्थेचे अज्ञान आहे. आयात कमी करून निर्यात वाढवल्यास देशाचा जीडीपी वाढतो, हे साधे गणित त्यांना समजत नाही. काँग्रेसच्या काळात राहुल गांधी यांनी यश मिळवले असते, तर त्यांच्या पक्षाची आज ही अवस्था झाली नसती. मोदींना अडचणीत आणण्याचे विरोधकांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ​देशासमोर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची जी समस्या आहे, ती दूर करण्यासाठी सत्ताधारी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.