राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातल्या सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या ट्वीटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

यावेळी फडणवीस आणि राणे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित करत संविधानाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित केलं. या भाषणानंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना मिलिंद नार्वेकरांच्या एका ट्विटविषयी प्रश्न विचारण्यात आला. आजचा दिवस बाबरी मशीद बलिदान दिवस असल्याच्या आशयाचं एक ट्वीट त्यांनी आज केलं आहे.

या ट्विटबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, नार्वेकरांचं बरोबरच आहे. त्यात चुकीचं काय? एवढ्यात नारायण राणे म्हणाले, नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना? असं म्हणताच त्यावर पुढे काहीही न बोलता राणे निघून गेले. आपण सगळ्यात शेवटी बोलणार असल्याचा इशाराही त्यांनी जाता जाता दिला. मात्र, त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.