गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटन प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर उद्या अर्थात शनिवारी उद्घाटन होणार आहे. विमानतळ सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होण्याच्या आधीच त्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. एकीकडे शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाकडून चिपी विमानतळ उभं केल्याचे बॅनर्स झळकावले जात असताना दुसरीकडे नारायण राणेंनी चिपी विमानतळ उभारण्यासाठी मीच प्रयत्न केले असून त्याचं श्रेय माझं आणि भाजपाचं असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्याआधीच त्याच्या श्रेयावरून वाद मात्र सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पाहुणे म्हणून या, पदाप्रमाणे…”

नारायण राणे यांनी भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चिपी विमानतळाचं श्रेय लाटत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, यावेळी त्यांनी विमानतळाचं श्रेय आम्हाला द्यायला हवं, असं सांगितलं आहे. “चिपी विमानतळाचं सर्व श्रेय भाजपा आणि आमचं आहे. हे इतर कुणाचंही श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलावलं आहे. पाहुणे म्हणून या, पदाप्रमाणं काहीतरी द्या आणि जा”, असं राणे यावेळी म्हणाले आहेत.

“माझं तसं त्यांच्याशी काही वैर नाही”

दरम्यान, यावेळी नारायण राणेंनी आपलं शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंशी काही वैर नसल्याचं मिश्किलपणे म्हटलं. “तुम्ही या, उद्घाटन करा. पण हे आम्ही केलंय हे मान्य करा. माझं त्यांच्याशी तसं काही वैर नाही. पण काहीही न करता मिरवतात. काही लायकीच राहिली नाही त्या पदाची. उद्धव ठाकरे येऊ द्यात, त्यांचं स्वागत आहे. वाटल्यास सिंधुदुर्गातल्या म्हावऱ्याचा पाहुणचार करू. पण श्रेय घेऊ नका”, असं राणे यावेळी म्हणाले.

कार्यक्रम पत्रिकेवरही राणेंचा आक्षेप

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी छापण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर देखील नारायण राणेंनी आक्षेप घेतला आहे. “मी राजकारणातील अनुभव आणि प्रोटोकॉलनुसार उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य सिंदिया या दोघांपेक्षा वर आहे. पण तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिलं स्थान दिलं हे मान्य आहे. पण माझंच नाव छापताना अक्षर बारीक कसं झालं. ही अशी संकुचित वृत्ती आहे त्यांची”, असं राणे म्हणाले.

“उद्या जाहीर सभेत मी भांडाफोड करणार”, चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणेंचा इशारा!

विरोधी पक्षांना निमंत्रण नाही

राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न दिल्याबाबत देखील नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली. “मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देताना विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण दिलंच पाहिजे. मान ठेवलाच पाहिजे. पण तो नाही ठेवला गेला. त्यावर कायदेशीर तरतूद नसली, तरी यातून त्यांची नीती दिसून आली. देवेंद्रजींच्या जागी मी असतो, तर चित्र वेगळं असतं. कुठेही असा काही कार्यक्रम असेल, प्रकल्प सुरू होत असेल, तर तिथले विरोधी पक्षनेते असतातच. मुख्यमंत्री असतील, तर विरोधी पक्षनेते असतीलच. मी याबाबत फडणवीसांशी बोललो देखील. पण ते म्हणाले हे लोकांच्या हिताचं आहे. त्यामुळे यात आपण आंदोलन वगैरे काहीही करायचं नाही”, असं नारायण राणेंनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane mocks cm uddhav thackeray chipi airport inauguration credit to bjp pmw
First published on: 08-10-2021 at 17:12 IST