एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असल्यासंदर्भात विचारलं असता नारायण राणे हसून म्हणाले, “ते कुठं आहेत असं…”

पुण्यातील फुगेवाडी मेट्रो स्थानकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नारायण राणेंनी हजेरी लावली होती.

Narayan Rane Eknath Shinde
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली प्रतिक्रिया (फोटो एएनआयावरुन साभार)

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. काल सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे पक्षाच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याच पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदारांची दुपारी १२ वाजता बैठक बोलावली आहे. असं असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

योगदिनानिमित्त फुगेवाडी मेट्रो स्थानकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नारायण राणेंनी हजेरी लावली होती. याचवेळेस त्यांना काल लागलेल्या विधान परिषदेच्या निकालांसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना राणेंनीच पत्रकारांना, “देशात आणि राज्यात काँग्रेस राहीलय काय?” असा प्रतीप्रश्न केला.

काँग्रेसला टोला…
नारायण राणेंना राजकारणासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी, “मी योग दिनानिमित्त आलोय, तुम्ही थेट निवडणुकीवरील प्रश्न विचारताय कमालच आहे,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना, “आज योग दिन आहे. ७५ ठिकाणी साजरा झाला आहे. जनतेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा योगा दिन साजरा केला जातोय. त्याने प्रतिकार शक्ती वाढते. देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं राहिलंय काय? काँग्रेस संकुचित होत चाललीय. केवळ बोलतात, त्यांचं अस्तित्व राहील नाही. देशात त्यांचे नेते, कार्यकर्ते काम करत नाहीत. त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश राहिला नाही त्यामुळं त्यांचा पराभव झाला,” असं राणे म्हणाले.

एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले?
काल सायंकाळपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचा मुद्दा उपस्थित करत नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नारायण राणेंनी हसून, “एकनाथ शिंदे हे नॉटरीचेबल आहेत. ते कुठं आहेत असं सांगायचं नसतं,” असं उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.

मतं फुटली…
शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि १३ आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.

शिंदे अलिप्त…
एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत सर्वच गोष्टींपासून अलिप्त होते. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार सायंकाळपासूनच शिंदे आणि १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजल्यानंतर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या सेलिब्रेशनऐवजी बैठकीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित होते. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती.

शिंदे गुजरातमध्ये? हॉटेलची सुरक्षा वाढवली…
मातोश्रीवरील या बैठकीच्या आधी आणि नंतरही शिंदेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिंदेशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यातच आता त्यांच्या फोनवर कॉल केल्यावर गुजराती भाषेमध्ये मोबाईल सेवेची ट्यून ऐकू येत असल्याने ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली असून काही वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्तांकन केलं आहे. असं असलं तरीही शिंदे नेमके कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाही. काल रात्रीपासूनच शिवसेनेचे आमदार वास्तव्यास असलेल्या ला मेरिडीअन हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही वृत्त आहे.

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी घेतली भेट
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे नॉट रिचेबल असल्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊ उद्धव यांची भेट घेतल्याची माहितीही समोर येत आहे. अशातच आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला तरी एकनाथ शिंदे उपस्थित राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत.

दहा दिवसात दुसरा धक्का…
भाजपाने या निवडणुकीच्या माध्यमातून १० दिवसांमध्ये दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला धक्का दिलाय. भाजपाचे पाचही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले असून सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचा फायदा भाजपाला झाल्याचं सांगितलं जात आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्याइतकी मतं नसताना भाजपाने पाच उमेदवार निवडून आणण्याचा चमत्कार केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला.

शिवसेनेवर नामुष्की
शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली असावीत. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली.

राष्ट्रवादीची ती मतं कुठून?
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. ही मते महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची की भाजपाची, अशी चर्चा सुरू झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narayan rane on eknath shinde not reachable scsg

Next Story
“काँग्रेसचं आता काय राहिलंय?” विधान परिषद निवडणुकीनंतर नारायण राणेंची टीका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी