आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं आहे. तसंच गद्दारी केलेली चालणार नाही, असं सांगत खडसावलंही आहे.

यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे सत्ता भाजपची पाहिजे. मला येणाऱ्या निवडणुकीत गद्दारी अजिबात चालणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं ते आता खपवून घेणार नाही. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच पण दुसरं काय करायला लावू नका”.

कार्यकर्त्यांना इशारा देताना नारायण राणे म्हणाले, “जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या मध्ये सत्ता भाजपाची पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुकीत तीन विरूद्ध एक आहोत. मला ४६ जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत निवडून गेलेले पाहिजेत. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवा. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी.नडडा यांना दाखवून द्या की सिंधुदुर्ग जिल्हात शंभर टक्के भाजप आहे. हा सिंधुदुर्ग जिल्हा शंभर टक्के नारायण राणे यांच्या सोबत आहे हे दाखवून द्या. फितुरी तर मी खपवूनच घेणार नाही. उद्धव ठाकरे काय बोलतो तुम्ही चिपीत बघितलं. मला शत प्रतिशत भाजपा हवाय. मी डिसेंबरमध्ये शिवसेनेसह अन्य लोकांना प्रवेश देणार आहे”.