“...तेव्हा नाही का वाटली लाज, जनाची नाही मनाची?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता | Narayan Rane presented a poem criticizing Uddhav Thackeray msr 87 | Loksatta

X

“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता

“अडीच वर्षे या महाराष्ट्राला कलंक लागला होता”, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता
(फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना, एक कविताही सादर केली.

मी कवी नाही ही कविता दुसऱ्याने केली आहे. कवितेचं शीर्षक आहे, ‘तेव्हा नाही का वाटली लाज?’ असं सांगत नारायण राणेंनी कविता सादर केली –

“वाझे सारखे वर्दीतले गुंड जेव्हा तुम्ही पाळले होते, वसुलीचा वाटा घ्यायला हात तुमचे सरसावले होते. अडीच वर्षात लूट केली परवा नव्हती कुणाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“कोविडची कंत्राटं युवराजाच्या आदेशाने मिळवली, माणसं मरताय कधी खुर्ची नाही सोडली. मेवा खाणे वृत्ती तुमची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“औरंगजेबच्या कबरीवर फुलं उधळली गेली, सत्ता हाती असताना अटकेची हिंमत नाही झाली. छत्रपतींच्या मातीत महती गायली टिपू सुलतानाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“मातोश्री दोनचा टॉवर बघा कसा उभा केला, रिसॉर्ट बांधताना कायदा पायदळी तुडवला. मराठी माणूस मुंबईच्या खड्ड्यातच गेला, पाहा तरी एकदा बदली कशीकशी केली कुणाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“अवकाळी पावसाचं उभं पीक होतं झोडपलं, बांधावर ५० हजार देण्याचं आश्वासन पण दिलं, विमा कंपन्या बळीराजाला लुटताना घेतली होती का बिनपाण्याची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“दाऊदच्या प्रॉपर्टीत मंत्री हिस्सेदार बनला, राजीनामा तर दूर उलट ऐटीतच बसला. कुणाच्या कृपने चंगळ होती अशा खानदानाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“मराठा, ओबीसी, आरक्षण होतं गमावलं, सत्ता राखण्याच्या नादात सत्य मात्र लपवलं. मुका मोर्चा म्हणत खिल्ली उडवली त्या समजाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

हेही वाचा – “… म्हणून उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द उच्चारूदेखील नये”; नारायण राणेंची टीका

याशिवाय, “कितीवेळा लाज जनाची नाही मनाची, एखादा माणूस संन्यास घेऊन घरी बसेल. किती लाज काढली आहे, किती प्रकरणं आहेत. ही कविता लोकांपर्यंत पोहचवा. अडीच वर्षे या महाराष्ट्राला जो कलंक लागला होता, तो कसा होता हे लोकांना कळू द्या. परत अशी चूक लोकं करणार नाहीत, याची ते खबरदारी घेतील म्हणून ही कविता वाचून दाखवली आहे.” असंही यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 20:27 IST
Next Story
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!