“लवकरच राज्यात भाजपा सरकार येणार अन् राज्यासहीत देशात पुढील ५० वर्षे भाजपाची…”; नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास

“शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही बकरी सेना झाली आहे,” असंही राणे म्हणाले.

BJP Rane
देवबागमध्ये बोलताना राणेंनी व्यक्त केला विश्वास

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील देवबाग येथील जाहीर सभेमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधतानाच केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं आहे. येथील सभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान राणेंनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राज्य लुटण्याचे काम करत आहे. विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपाची सत्ता कायम राहील,” असा विश्वास व्यक्त केलाय.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार, खासदारांवर नारायण राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान कठोर शब्दांमध्ये टीका केली. “शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही बकरी सेना झाली आहे,” अशा शब्दांमध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

सागरी अतिक्रमणाचा धोका वाढलेल्या देवबाग किनारपट्टीवर अत्यावश्यक ठिकाणी त्वरीत बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी एक कोटींचा खासदार निधी तात्काळ उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली. या बंधारा उभारणी कामाचे भूमिपूजन रविवारी राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे म्हणले, नारायण राणेंनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकारी यांनी खासदार निधीतुन होणाऱ्या बंधारा उभारणी कामास एका मिनिटात मंजुरी दिली. जिल्हाधिकारी यांनी जनतेसाठी दाखवलेली तत्परता आमदार वैभव नाईक यांना आठ वर्षात दाखवता आली नाही. आठ वर्षात बंधारे बांधले नाहीत मात्र नारायण राणेंनी बंधाऱ्यासाठी एक कोटी निधी देताच बंधारे मी आणले म्हणून भूमिपूजने सुरू केली. नारायण राणेंनी निधी आणला त्यानंतर आमदारला जाग आली. मात्र कमिशन घेऊन कामे सुरू आहेत. एवढ्या छोट्या मनाचा आमदार महाराष्ट्रात पाहिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली

“कोरोना अगोदर केलेल्या कामांचे भूमिपूजन आमदार करतो. या आमदाराला विधानसभेत कोण ओळखत नाही. यापूर्वीचे इथले आमदार विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे. आणि आता कोण आमदार? हे चित्र बदलले पाहिजे. आठ वर्षात मतदारसंघात काही मिळाले नाही. सरकारी पैसे कधीतरी येतात आणि कामे होतात. यापलीकडे आमदाराचे काम नाही,” अशी टीका निलेश राणे यांनी केली.

२०२४ ला महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विकासकामे भाजपाच्या माध्यमातून झाली आणि यापुढेही होतच राहतील, असा ठाम विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हासरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मोहन कुबल, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, दाजी सावजी, फादर संजय, भटजी व देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवबाग ग्रामस्थांच्या वतीने नारायण राणेंचा भव्य सत्कार करण्यात आला. देवबाग गावच्या शिवसेनेच्या महिला सरपंचाचे पती मनोज खोबरेकर यांनीही नारायण राणे यांचे विशेष स्वागत केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narayan rane says bjp will come in power maharashtra will stay in power for next 50 years scsg

Next Story
राज्य सरकारकडूनही दिलासा ; मूल्यवर्धित करात कपात : पेट्रोल २.०८ रुपये, तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी