सावंतवाडी  : राज्यसरकार पाडण्यासाठी भाजपाचे नेते आणि मी धक्के देत राहणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवारीला उमेदवारी दिली जाईल, असे ते म्हणाले.

येथील भाजपा मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, महेश सारंग, अजय गोंदावळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाला धक्के लागत नाही तर भाजपा धक्के देतो असे रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत आपलाच विजय आहे. असे त्यांनी सांगत राज्य सरकारला पाडण्यासाठी धक्के देत राहणार असल्याचा इशारा दिला.

येणाऱ्या निवडणुकीत खासदार, आमदार भाजपाचे असतील असेही त्यांनी भाष्य केले. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, सत्ताधारी शिवसेनेमुळे एसटीचा संप आहे. त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा तर काँग्रेस मागे आहे. चाळीस एसटी कामगार मृत्यू झाले आहेत. तरी लक्ष दिले जात नाही. मात्र आमचा पाठिंबा हा कामगारांना आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते  एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपामध्ये कोणी गद्दारी करणार नाही. गद्दारी केली तर अद्दल घडवली जाईल. हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वत्र भाजपमय वातावरण होणार आहे. सावंतवाडी व कुडाळ आमदार आणि खासदार सुद्धा भाजपचा असणार आहे. करोनामुळे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग बंद झाले आहेत किंवा कसे? याबाबत एजन्सी नेमून अहवाल मागविण्यात आला आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय लघु मध्यम उद्योग विभागामार्फत क्रीडा महोत्सव भरवला जाईल. तसेच भारताचा ७५ वा अमृतमहोत्सव देखील जिल्ह्यात सेलिब्रेट केला जाईल, असे राणे यांनी सांगितले.